अपुऱ्या आहारातून मानवाला ८० टक्के आजार होतात. या धावपळीच्या युगात आरोग्याची समस्या एक आव्हान निर्माण झाली आहे. आरोग्याच्या समस्यांचे समाधान व निराकरण करण्याची क्षमता पौष्टिक भरडधान्यामध्ये आहे. त्यामुळे हे वर्षं आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त भरडधान्य पदार्थ दिवस साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्यवर्धक, वातावरण पूरक तसेच कमी पाण्यात आणि कमी निविष्ठांमध्ये येणाऱ्या भरडधान्याची जगाला गरज असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. डॉ. विलास खर्चे यांनी जगामध्ये २० टक्के तृणधाण्याच्या साठा एकट्या भारतातून उपलब्ध होत असल्याचे सांगून, भारतातील भरडधान्य उत्पादन तसेच उत्पादकतेवर भविष्यात आरोग्यमय जीवन अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा >>>नागपूर: अस्वलाचं बिऱ्हाड पाठीवर
विविध भरडधान्य पदार्थाचे प्रदर्शन आयोजन करून आरोग्य जीवन पद्धतीसाठी पौष्टिक तृणधान्य सेवनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. आर.बी. घोराडे, तर सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक डॉ. गोपाल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.