नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच अजनीत प्रस्तावित मल्टी माॅडल बसस्थानकाचा आढावा घेतला होता. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी प्रस्तावित मेडिकलसह इतर विभागांच्या जागेची पाहणी केली. यावेळी मेडिकलला १८ एकर जागेच्या बदल्यात ८०० गाळे तयार करून देण्याचे संकेत दिले गेले.
अजनीत प्रस्तावित मल्टी माॅडेल बसस्थानकासाठी मेडिकलची १८ एकर, मध्यवर्ती कारागृहाची १२८ एकर, सिंचन विभागाची ३० एकर, एफसीआय गोदामाची ३८ एकर जागेची गरज आहे. या प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे बुधवारी दुपारी प्रस्तावित जागेवर पोहचले. दरम्यान, येथे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मध्यवर्ती कारागृह, सिंचन विभाग, एफसीआय गोदामाशी संबंधित सगळे वरिष्ठ अधिकारीही हजर होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल परिसरातील कर्मचारी वसाहतसह इतरही भागाची पाहणी केली. याप्रसंगी मेडिकलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी अद्ययावत जागा मिळावी म्हणून टीबी वार्ड परिसरात अद्ययावत वसाहतीचा प्रस्ताव दिला गेला. त्यात वर्ग १ ते ४ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी ८०० गाळे संबंधित जागेच्या बदल्यास बांधून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे मेडिकलच्या हक्काची महत्त्वाची १८ एकर जागा जाणार असली तरी त्याबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगले अद्ययावत गाळे उपलब्ध होण्याचे संकेत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.