नागपूर-मुंबई-पुण्यात ८५ चिमुकले आईसह कोठडीत; फक्त पुण्यातील येरवडा कारागृहात सुविधा
अनिल कांबळे
गर्भवती, किंवा सहा वर्षांखालील मुलाची आई असलेल्या महिलेच्या हातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास तिला बाळासह कारागृहात बंदिस्त केले जाते. अशा स्थितीत मुलांची काळजी घेण्यासाठी कारागृहात ‘मदर सेल’ असावा, असा नियम आहे. परंतु, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह सोडले तर इतर कुठल्याही कारागृहात ‘मदर सेल’ नाही.
राज्यातील ९ मध्यवर्ती कारागृह आणि ३१ जिल्हा कारागृहापैकी फक्त पुण्यातील पुणे-येरवडा मध्यवर्ती कारागृहातच मदर सेलची स्थापना करण्यात आली. उर्वरित नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईसह इतर ३९ कारागृहांपैकी एकाही कारागृहात ‘मदर सेल’ नाही. त्यामुळे जवळपास ८५ वर मुलांना आईसोबत कारागृहात राहावे लागत आहे.
येरवडय़ात जवळपास १४ मुलांचा सांभाळ आणि शिक्षणाची व्यवस्था कारागृह प्रशासनाकडून होत असल्याची माहिती आहे. नागपूर कारागृहात ९ महिला कैद्यांसह त्यांची मुलेही आहेत. मात्र, त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी मदर सेल नाही.
गर्भवतींची विशेष काळजी
कैदी महिलेसह तिच्या मुलाचे वय ६ वर्षे होईपर्यंतच त्याला कारागृहात ठेवण्याची मुभा आहे. मुलगा ६ वर्षांचा झाल्यानंतर त्याची शिक्षण आणि निवासाची व्यवस्था मुलांच्या बाल संरक्षणगृहात करावी लागते. जर बंदिवान गर्भवती असेल तर त्या महिलेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण मंत्रालयाने कारागृह प्रशासनाला दिल्या आहेत.
मुलांच्या मानसिकतेवर परिणाम
महिला कैद्यांच्या सहा वर्षांखालील मुलांना नातेवाईकांनी ठेवण्यास नकार दिल्यास त्यांना थेट महिला कैद्यांसोबत कारागृहातच ठेवण्यात येते. कारागृहातील बंदिस्त वातावरणाचा या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.
राज्यभरातील ३३ कारागृहात १३६६ महिला कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील ७६ महिला कैदी आपल्या ८५ मुलांसह कारागृहात राहतात. त्यांची अंगणवाडी-बालवाडीमध्ये शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. ज्या कारागृहात गरज आहे, तेथे ‘मदर सेल’ स्थापन करण्यात येईल.-अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक, कारागृह विभाग.