प्रवासी मिळावे म्हणून कधीकाळी संघर्ष करणाऱ्या मेट्रोला आता प्रवाशांचा घसघशीत प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल ८५ हजार नागपूरकर प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला.दोन वर्षातील ही विक्रमी संख्या आहे.
दोन वर्षा आधी मेट्रो सुरू झाली तेव्हा त्यात कोणीच बसत नव्हते.त्यानंतर करोनाचा फटका या सेवेला बसला.पण करोना नियंत्रित आल्यावर नागपूरकर मेट्रोकडे वळले. आता तर सर्वच फे-यांमध्ये प्रचंड गर्दी असते. १५ ऑगस्टला तब्बल ८५ हजार प्रवाशांनी प्रवास केला.बर्डी स्थानकावर तिकीट घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. फलाट, मेट्रो गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत होती.यापूर्वी २६ जून २०२२ रोजी मेट्रोतून ६५,००० प्रवाशांनी प्रवास केला होता.
शहरात सध्या मेट्रोचे दोन मार्ग सुरू आहेत.दोन मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात कामठी आणि सीए मार्ग या दोन मार्गांचा समावेश आहे. हे दोन्ही मार्ग सुरू झाल्यावर दरदिवशी मेट्रोतून प्रवास करतील,असा विश्वास महामेट्रोला आहे. मेट्रोची सूसज्ज स्थानके आण अल्प तिकीट दर यामुळे तरुणाई आणि विद्यार्थ्यांमध्ये मेट्रोला पसंती आहे.