लोकसत्ता टीम
वर्धा : काश्मीर फिरायला गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असल्याची बातमी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यामुळे आप्त मंडळींनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ४६ प्रवासी वर्धेकरांशी संपर्क झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने नमूद केले. ते सर्व परतीच्या प्रवासासाठी सज्ज आहेत, पण अडकून पडले आहेत.
श्रीनगरपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सीआरपीएफ बटालियनच्या तंबूत थांबलेले नीरज देशपांडे हे तेथून लोकसत्ता सोबत संवाद साधतांना म्हणाले की आम्ही सुखरूप आहोत, पण त्रस्त आहोत. आमच्यासोबत २० महिला व १० लहान मुले आहेत. सैन्याने आमची खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था केली. तक्रार नाही. पण परतीची ओढ लागली आहे. वाट बिकट आहे. आम्ही आमदार राजेश बकाने यांच्याशी संपर्क केला. त्यांनी धीर देत परतीच्या प्रवासासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याची हमी दिली. देशपांडे हे देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील आहेत. आमदार बकाने म्हणतात की अडचणीत असले तरी सर्व सुखरूप आहेत. लवकरच ते परत येतील.
वर्धेकर प्रवासी मंडळींपैकी काही श्रीनगर व जम्मूत आहेत. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा एकही वर्धेकर घटनास्थळी म्हणजे पहलगाम परिसरात नव्हता. मात्र घटना घडल्यानंतर सर्वांना परतीची ओढ लागली आहे. प्रवाशांनी जम्मूपर्यंत सोडून देण्याची विनंती केली. पण सर्व रस्ते बंद व वाहने अडकलेली अशी स्थिती असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहाय्यक श्रीनगर या ठिकाणी दाखल झालेत. ते वर्धेकरांना भेटायला जाणार आहेत.
काही प्रवासी १७ तारखेस कटरा येथे पोहचले. वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. तेथून एक छोटे वाहन घेऊन पुढच्या प्रवासास निघाले असतांना गोळीबार झाल्याचे त्यांच्या कानी पडले. भीतीचा गोळा उठला. या परिसरात मोठ्या प्रमाणात दरड कोसळत असल्याने वाटा बिकट झाल्यात. वाहने कमी व प्रवासी अधिक अशी स्थिती उद्भवली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे शुभम घोरपडे म्हणाले की, सर्व वर्धेकर प्रवासी संपर्कात आहेत. सुखरूप आहेत. येण्याची ओढ लागली आहे. ते दिल्लीत उद्या बसने दाखल होणे अपेक्षित असल्याचे घोरपडे सांगतात. आमदार बकाने यांनी या अडकून पडलेल्या मंडळीसोबत बोलतांना केंद्र व राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करीत असल्याचे सांगत दिलासा दिला.