राज्यभऱ्यातील जागा कपातीच्या संकेताने विद्यार्थ्यांमध्ये रोष
महेश बोकडे
नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ (नाशिक)ने राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तर प्रवेशासाठी शिक्षकांच्या संख्येनुसार विद्यार्थ्यांचे सिट मॅट्रिक्स जाहीर केले आहे. यानुसार या महाविद्यालयांत २४९ पैकी १६० जागांवरच प्रवेशाची शक्यता आहे. त्यामुळे ८९ जागांवर गंडांतर आल्याचा निमाच्या विद्यार्थी संघटनेचा आरोप आहे. आयुष संचालकांनी मात्र पूर्ण जागांवर प्रवेश देण्याचा दावा केला आहे.
राज्यात नांदेड, उस्मानाबाद, मुंबई, नागपूर, जळगाव अशी पाच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालये आहेत. नुकतेच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने महाविद्यालयातील या सर्वच महाविद्यालयांचे निरीक्षण केले होते. त्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागा, रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णशय्यांचा अभाव असल्याचे पुढे आले. यामुळे पाचही महाविद्यालयातील पदवीच्या ५६३ आणि पदव्युत्तरच्या २६४ जागांचे प्रवेश थांबवण्यात आले होते.
आयुष संचालक आणि महाराष्ट्र शासन यांनी न्यायालयात जागा भरण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने प्रवेशबंदी उठवली. यावेळी शासनाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीची कंत्राटी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे काहींची पदोन्नतीकरून जागा वाचवण्याची धडपड सुरू आहे. परंतु तुतार्स कंत्राटी शिक्षक घेतले जात आहेत. पाच महाविद्यालयात पदव्युत्तर (एमडी) अभ्यासक्रमाच्या २६४ जागा होत्या. मात्र महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिट मॅट्रिक्सनुसार या महाविद्यालयांतील १६० जागाच भरण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ८९ जागा कमी होणार असल्याने या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.
हेही वाचा >>> निवासी डॉक्टरांचा संप सुरू
“शासनाने शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षकांची पदोन्नती केली असून बरीच पदे कंत्राटी पद्धतीने भरली. त्यांना तातडीने महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाला पाठवले जाईल. त्यानंतर सिट मॅट्रिक होऊन पदव्युत्तरच्या जागा वाढतील. त्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नाही.”
– डॉ. राजशेखर रेड्डी, संचालक, आयुष, मुंबई.
पदव्युत्तरच्या जागा कमी झाल्यामुळे प्रावीण्यप्राप्त तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने आयुर्वेद एम.डी., एम.एस. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तात्काळ ठोस निर्णय घ्यावा.
-डॉ. राहुल राऊत, राज्य सचिव, निमा स्टुडंट फोरम.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सिट मॅट्रिक्सनुसार स्थिती
महाविद्यालय एकूण पदव्युत्तर जागा कमी केलेल्या जागा शिल्लक जागा
मुंबई ५६ ११ ४५
नागपूर ७५ ३७ ३८
उस्मानाबाद ६० ३३ २७ नांदेड ५८ ०८ ५०