अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : नागपूर शहराची ‘ऑरेंज सिटी’ ते ‘क्राईम सिटी’ ओळख निर्माण व्हायला वाढती गुन्हेगारी जबाबदार आहे. शहरातील टोळीयुद्ध आणि कौटुंबिक कलहातून सर्वाधिक हत्याकांड घडले असून गेल्या दहा वर्षांत तब्बल ८९४ हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
हेही वाचा >>> संत साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद झाला तरच भारत विश्वगुरू! सरसंघचालकांचे प्रतिपादन
पोलीस विभागाचा वचक संपल्यामुळे गुन्हेगारांचे उपराजधानीत वर्चस्व वाढत आहे. गुन्हे शाखेची पथक वारंवार गुन्हेगारांच्या संपर्कात येत असल्याने त्यांचेही अर्थपूर्ण संबंध निर्माण होत आहेत. पोलीस ठाण्यातील डीबी पथकेसुद्धा गुन्हेगारांशी मधुर संबंध ठेवून स्वतःचा फायदा करून घेत आहेत. तसेच काही गुन्हेगारांचा समाजात अजूनही एवढा वचक आहे, की नागरिक गप्प बसून अन्याय सहन करीत आहेत. याच कारणामुळे नागपुरात गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या १० वर्षात (२०१३ ते २०२२) दरम्यान उपराजधानीत ८९४ खून झालेले आहेत. यात जवळपास ३० ते ४० टक्के हत्याकांडांध्ये कुख्यात गुन्हेगार, किरकोळ गुन्हेगार, व्यसनी युवक आणि गँगवॉरमधील सदस्यांचा समावेश आहे. कौटुंबिक वाद, भूखंडाचा वाद, पैशाचा वाद आणि किरकोळ कारणातून सर्वाधिक हत्याकांड झाल्याचे उघडकीस आले आहे. गँगवॉरमधून घडलेल्या हत्याकांडाचाही आकडा मोठा आहे.
हेही वाचा >>> नागपूर : उपराजधानीत आकर्षक चित्रांनी सुशोभित भिंती पुन्हा काळवंडण्याच्या मार्गावर
सर्वाधिक हत्याकांड हे अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, प्रेमसंबंध, प्रेमात दगा देणे तसेच विश्वासाच्या नात्याला तडा देण्यातून झाले आहेत. टोळीयुद्ध किंवा कट रचून खून करण्याच्या घटनेपेक्षा कौटुंबिक कारणातून बरेच हत्याकांड झाले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका, प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार, स्थानबद्धतेच्या कारवाईचा धडाका लावला होता. तसेच जुगार अड्डे संचालक, वरली-मटका संचालक, अवैध दारूविक्रेत, अवैध सुपारी-धान्य व्यापारी आणि सट्टेबाजीवर अंकुश मिळवला होता. शहरातील टोळ्यांवर कठोर कारवाई केली. टोळीयुद्ध होऊ नये म्हणून अनेक गुन्हेगारांना कारागृहात बंदिस्त केल्यामुळेच २०२२ मध्ये सर्वाधिक कमी हत्याकांड घडले.
गुन्हेगारांचे ‘नेटवर्क’ तोडण्यात पोलिसांना यश आले. अवैध धंदे बंद करण्यावर आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर देण्यात आला. रात्रीच्या गस्तप्रणालीवर लक्ष ठेवले. तसेच गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी योजनाबद्ध कारवाई करण्यात आली. त्यामुळेच हत्याकांडामध्ये घट झाली.
– मुमक्का सुदर्शन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.