चंद्रपूर : एका मुलाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहिले. संकट काळात देवासारखा धावून आल्याबद्दल धन्यवादाचे. या मुलाच्या हृदयाला छिद्र होते. यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र, शस्त्रक्रियेसाठी दीड लाखांचा खर्च होता. त्या मुलाच्या आई-वडिलांकडे एवढी रक्कम नव्हती. आर्थिक जुळवाजुळव कशी करायची यासाठी आई-वडील चिंतेत होते. अशा कठीण समयी मंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले. मुलाला जीवनदान लाभले.
हेही वाचा >>> नागपूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रहिवासी पारस कमलाकर निमगडे हा आठव्या वर्गातील विद्यार्थी आहे. पारस एक दिवस भोवळ येऊन कोसळला. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला पालकांना दिला. यासाठी दीड लाखांचा खर्च अपेक्षित होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये कुठून जमवायचे, या प्रश्नाने वडील कमलाकर निमगडे चिंताग्रस्त होते.
हेही वाचा >>> मालेगाव आणि रिसोड येथे कडकडीत बंद, शिरपूर जैन येथील घटनेचा निषेध
गावाचे उपसरपंच सुरेंद्र धाबर्डे आणि अमर बोडलावार यांना मुलाच्या आजाराबाबत सांगितले. पारसने थेट मुनगंटीवार यांना पत्र लिहिले. त्यानंतर निमगडे परिवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले. मुनगंटीवार यांना ही बाब कळताच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून पारसची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीनंतर सावंगी मेघे येथील रुग्णालयात पारसवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. पारसची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. पारसवर शस्त्रक्रिया पूर्ण होईस्तोवर मुनगंटीवार सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून होते. शस्त्रक्रियेनंतर पारसची प्रकृती ठणठणीत झाली आहे. संकटकाळी देवासारखे धावून आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचे पारसने एक भावनिक पत्र लिहून आभार मानले. ‘साहेब, आम्ही ओळखीचेही नसताना तुम्ही देवासारखे आमच्यासाठी धावून आलात. त्याबद्दल खूप खूप आभार…’ अशा शब्दात पारसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.