लोकसत्ता टीम
नागपूर : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच मागील काही वर्षांमध्ये सातत्याने वीज दर वाढल्याने येणाऱ्या देयकाची रक्कम बघून सामान्यांमध्ये संतापही व्यक्त होत आहे. हल्ली विदर्भातील ९.४८ लाख ग्राहकांना महावितरणकडून चक्क शून्य वीज देयक आले. त्यामुळे या योजनेबाबत सामान्यांमध्ये आकर्षण असून त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
महावितरणकडून विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्हयातील ९ लाख ४८ हजार ७९८ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना त्रैमासिक देयक शून्य आले आहे. या शेतकऱ्यांना वीजदेयक प्राप्तीच्या पावत्या म्हणजेच शून्य वीजबिलांचे वितरण महावितरणकडून केले गेले. राज्यात महावितरणचे ४७ लाख ४१ हजार कृषिपंपधारक वीजग्राहक आहे. त्यांच्याकडून ३९ हजार २४६ दशलक्ष युनिट वार्षिक वीजवापर होतो.
आणखी वाचा-खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र, तीन दिवसांत दुसऱ्यांदा हैदराबादमधून धमकी
राज्यातील शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे. अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली. त्याची अंमलबजावणी महावितरणकडून सुरू आहे. योजनेनुसार राज्यातील ४४ लाख २८ हजार ५६४ पात्र शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठ्यासाठी १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान महावितरणला शासन देणार आहे. त्यानुसार विदर्भातील ९ लाख ४८ हजार ७९८ पात्र शेतकऱ्यांचे एप्रिल ते जून २०२४ या त्रैमासिक वीज देयकांपोटी शासनाकडून ४८७ कोटी ५८ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. त्याबाबतची पावती शेतकऱ्यांना शासनाकडून वाटप करत शून्य देयकाचे देयक दिले गेले.
आणखी वाचा-रामेटकमधील पेंच नदीच्या कालव्यात चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
बुलढाण्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ
योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १ लाख १ हजार ८५७ कृषिपंपधारक शेतकऱ्यांचे ३९.२२ कोटीचे, वर्धेतील ८२ हजार २१० कृषिपंपधारकांचे ३९.२२ कोटींचे, अकोलातील ६७ हजार ६४४ कृषीपंपधारकांचे ४७.४९ कोटींचे, अमरावतीतील १ लाख ४३ हजार ७८९ कृषीपंपधारकांचे ६९.९१ कोटींचे, भंडारातील ५६ हजार ६१८ कृषीपंपधारकांचे ३२.४९ कोटींचे, बुलढाणातील १ लाख ६७ हजार ५७० कृषीपंपधारकांचे ८२.६५ कोटींचे, चंद्रपूरातील ४७ लाख ८३४ कृषीपंपधारकांचे १२.८८ कोटींचे, गडचिरोलीतील ४१ हजार ७८४ कृषीपंपधारकांचे २२.७० कोटींचे, गोंदीयातील ४७ हजार २५१ कृषीपंपधारकांचे ३७.९६ कोटींचे, वाशिममधील ६४ हजात ९५५ कृषीपंपधारकांचे ४३.७३ कोटींचे, यवतमाळच्या १ लाख २७ हजार १२२ कृषीपंपधारकांचे ८०.९७ कोटींचे चालू वीज देयक माफ झाले आहे. या सर्वांना पुढील पाच वर्षे मोफत वीज मिळणार आहे.