नागपूर : नवव्या वर्गात नापास झाल्यामुळे मुलाला वडिलाने रागावत पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला. मात्र, वडिलांच्या रागावण्यामुळे दुखावलेल्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने घेतलेल्या अशा टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांत एकच खळबळ उडाली. पुष्कर रतन गजभीये (नवीन इंदोरा, बाराखोली चौक) असे मृत मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन गजभीये हे खासगी काम करतात. त्यांचा मुलगा पुष्कर हा नववीत होता. नुकताच शाळेचा निकाल लागला. त्यात पुष्कर नापास झाला. तो निकालपत्र घेऊन घरी आला. शनिवारी दुपारी चार वाजता वडिलांनी निकालपत्र बघताच आरडाओरड सुरू केली. पुढच्या वर्षी चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो, असा सल्ला दिला. ते कामानिमित्त घराबाहेर गेले. वडिलांच्या रागावण्यामुळे पुष्कर दुखावला गेला. तो रडतच आपल्या खोलीत निघून गेला. त्याने छताच्या पंख्याला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी त्याला चहा घेण्यासाठी आवाज दिला असता त्याने घराचा दरवाजा उघडला नाही. खिडकीतून बघितले असता पुष्कर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. कुटुंबियांनी लगेच पुष्करला खाली उतरवून मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुष्करच्या आत्महत्येमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.