नागपूरहून मुंबईला केवळ आठ तासांत; जिल्ह्य़ात एकूण ३१६.३६ हेक्टर जमीन लागणार

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी द्रूतगती महामार्गासाठी नागपूर जिल्ह्य़ातील हिंगणा तालुक्यात ९१ टक्के भूसंपादन झाले असून या तालुक्यातील हळदगाव येथे मातीकाम आणि जमीन समतल करणे सुरू आहे.

नागपूरहून मुंबईला केवळ आठ तास पोहोचण्यासाठी ७०१ कि.मी. अंतराच्या सुपर एक्सप्रेस वेची बांधणी सुरू आहे. नागपूर, बुटीबोरी, कारंजा, मालेगाव, जालना, औरंगाबाद, घोटी ठाणे, मुंबई, भिवंडी असा हा महामार्ग आहे. तो राज्यातील २४ जिल्ह्य़ातून जात असून त्यांच्या भूसंपादनास ठाणे आणि नाशिक तसेच नागपूर जिल्ह्य़ात काही ठिकाणी विरोध झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला, परंतु शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. हिंगणा तालुक्यात या महामार्गासाठी आवश्यक ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. शिवमडका येथून महामार्गाला प्रारंभ होत आहे. महामार्गासाठी जिल्ह्य़ात एकूण ३१६.३६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी ३०१.९४ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. यासाठी  २०३.११ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाईल. आतापर्यंत १८८.५९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. उर्वरित  १४.४२१ हेक्टर जमीन कौटुंबिक वाद आणि न्यायप्रविष्ट करणांमुळे ताब्यात आलेली नाही. हिंगणा तालुक्यातील मडगाव पासून ३१ किमीचा महामार्ग विकसित करण्याचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि. यांना देण्यात आले आहे. १ जानेवारी २०१९ ला कार्यादेश देण्यात आले आहेत. या कामासाठी १५६५ कोटी रुपये लागणार असून ३० महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर ३१ किमी ते ८९ किमीपर्यंतचे काम अ‍ॅफकॉन कंपनीला देण्यात आले आहे. याचे कार्यादेश १५ जानेवारी २०१९ ला देण्यात आले आहे. हे काम २७६१.९९ कोटी रुपयांचे आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता अशोक जगशेट्टीवार यांनी दिली.

नागपूर जिल्ह्य़ात तीन इंटरचेंज

हिंगणा तालुक्यातील शिवमडका, तादाळा आणि सेलडोह येथून एक्सप्रेस वेवर चढता आणि उतरता येणार आहे. वर्धा जिल्ह्य़ात येळाकेळी आणि वेरळू येथे इंटरचेंजचे बांधकाम केले जाणार आहे. तादाळा ते सेलडोह यांच्यामध्ये किन्ही जवळ टोला नाका राहणार आहे. राज्य सरकार  रस्ते विकास करणाऱ्या कंपनीला पैसा देईल आणि टोला नाक्यासाठी निविदा काढून कंत्राट दिले जाईल.

दोन्ही बाजूने ३ मीटर उंच भिंत

नागपूर ते मुंबई असा हा ७०१ किमी अंतराचा महामार्ग राहणार आहे. या महामार्गावर विनाअडथळा वाहतूक व्हावी म्हणून दोन्ही बाजूला तीन मीटर उंच भिंत बांधण्यात येणार आहे. अशाप्रकारे सुमारे ७०० किमी लांब भिंत बांधण्यात येईल. तसेच नागपूर जिल्ह्य़ात कुठेही महामार्गावर शहर वा नवीन गाव वसवण्यात येणार नाही. या महामार्गावर इतर २० ठिकाणी मात्र सर्व सोयींनी सुसज्ज नगर वसवण्यात येतील.

Story img Loader