लोकसत्ता टीम
गोंदिया : गोंदिया जिल्हा प्रशासनाने २८ सप्टेंबरला काढलेल्या नजर पैसेवारी नुसार गोंदिया जिल्ह्याची पैसेवारी ०.९५ पैसे एवढी काढण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ४ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या खाली आहे . ९१५ गावांची पैसेवारी ५० पैशाच्यावर आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पीक घेतले जाते. पाऊसावर अवलंब असलेली ही शेती आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम ७८ नुसार पैसेवारी च्या अनुपातानुसार जमीन महसूल तहकूब, कमी वा रद्द करण्यास समर्थन म्हणून शासनाचा महसूल विभाग प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढत असतो. यालाच आणेवारी असा शब्द प्रचलित होता. यंदा कमी पाऊस, विविध रोग यामुळे अनेक गावांत उत्पन्न कमी येण्याची शक्यता आहे. तरीही बंपर पैसेवारी आल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
आणखी वाचा-केंद्र, राज्याच्या योजना फसव्या; आता ‘होऊ द्या चर्चा’!
जिल्ह्यात यंदा पावसाने खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच दगा दिला. जून महिना कोरडाच गेला. तिसऱ्या आठवड्यात काहीसा पाऊस झाला. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात तीन दिवस दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे पेरणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी चिखल पेरणी केली. त्यानंतर मात्र पाऊस बेपत्ता झाला. परिणामी चिखल पेरणी केलेल्या प-ह्यांवर शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. काहींवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. जुलै महिनादेखील कोरडाच गेला. अधूनमधून आलेल्या पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. त्यानंतर मात्र पावसाने जास्तच हुलकावणी दिली. त्यामुळे रोवणी केलेले धान वाडू लागले. काही ठिकाणी कीड रोगांनी हल्ला चढविला. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली.
सप्टेंबर महिन्यात कमी कालावधीचे धान पीक फुलावर आहे. दमदार पाऊस झाल्याने फुल झडले. मात्र जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत बंपर दाखविण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. गोंदिया तालुक्यातील १५३ गावापैकी १४९ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या वर आहे. गोंदिया तालुक्याची पैसेवारी ९५ पैसे निघाली आहे. गोरेगाव तालुक्यातील ९९ गावापैकी ९४ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या वर आहे. एकूण जिल्ह्यातील ९१५ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या वर असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे.
आणखी वाचा-समृद्धीवर ‘बर्निंग बस’चा थरार! चालत्या ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग, पुढे झाले असे की…
पैसेवारीच ठरवते भरपाईचे निकष
शासनाच्या या निर्णयामुळे बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करण्याचा अधिकार प्राप्त होतो. शिवाय नुकसान होऊनदेखील मदत मिळते की नाही. हे पैसेवारीवरच अवलंबून आहे. जर पैसेवारी जास्त असेल, तर आता शेतसारा वसूल केला जातो. विद्यार्थ्यांची शालेय फी माफ होत नाही. याशिवाय पीकविमा कंपनी ही नुकसानभरपाईची रक्कम शेतक-यांना देणार की नाही. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.