नागपूर : आरोग्य विभागाकडून हिवताप नियंत्रणासाठी बरेच उपाय केल्याचा दावा केला जात असला तरी १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्यांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ८ हजार ३२४ हिवतापग्रस्तांची नोंद झाली. त्यापैकी ९४ टक्के रुग्ण एकटय़ा गडचिरोलीतील आहेत. यंदा या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण गेल्यावर्षीच्या ०.१३ टक्यांवरून वाढून ०.२५ टक्के असे नोंदवले गेले.
पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्यात सर्वाधिक ७ हजार ८३४ रुग्ण आढळले. त्यापैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला. भंडारात ९ रुग्ण आढळले. एकही मृत्यू नाही. गोंदियात ३५१ रुग्ण आढळले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. चंद्रपूर ग्रामीणला ११३ रुग्ण आढळले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. चंद्रपूर महापालिकेत १ रुग्ण आढळला. मृत्यू नाही. नागपूर ग्रामीणला १० रुग्ण आढळले. मृत्यू नाही. नागपूर महापालिका हद्दीत २ तर वर्धा जिल्ह्यात २ रुग्ण आढळले. दोन्ही जिल्ह्यात एकही मृत्यू नाही. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये नागपूर विभागातील या सहा जिल्ह्यांमध्ये हिवतापाचे ९ हजार ५०४ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा सुमारे एक हजाराने रुग्णसंख्या घटली, परंतु मृत्यूसंख्या वाढल्याचे चित्र आहे.
आरोग्य विभागाने कीटकनाशक फवारणीसह इतर उपाय केल्याने यंदा पाऊस जास्त पडल्यावरही हिवतापाची रुग्णसंख्या गेल्यावर्षीहून सुमारे एक हजाराने कमी आहे. ती आणखी खाली आणण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या गडचिरोलीत ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४ लाख लोकसंख्येचे रक्त नमुने घेऊन त्यात कुणाला हिवताप आढळल्यास उपचार केले जाईल.
– डॉ. श्याम निमगडे, सहाय्यक संचालक (हिवताप), नागपूर विभाग.