रेल्वे यात्रीचा पाहणी अहवाल
सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी बघता रेल्वे विशेष गाडय़ा सोडतात, परंतु त्या गाडय़ांसाठी मार्ग उपलब्ध होत नसल्याने यातील सुमारे ९५ टक्के गाडय़ा विलंबाने धावत असून सणांच्या दिवसात मूळगावी पोहोचण्याचा बेत आखणाऱ्यांचा हिरमोड होत आहे.
विशेष गाडय़ांना कित्येक तास विलंब होतो आणि प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय आणि प्रचंड मनस्ताप होतो. मात्र, रेल्वेच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे नाही. नियमित गाडय़ा वेळेत धावण्याच्या प्रमाणतेवर अधिकाऱ्यांची कामगिरी मोजली जाते, परंतु विशेष गाडय़ांना विलंब होत असला तरी त्याची दखल घेतली जात नाही. नियमित गाडय़ा वर्षभर धावतात, तर विशेष गाडय़ा केवळ काही दिवसांसाठी असल्याने रेल्वेच्या प्रतिमेवर फरक पडत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रेल्वे यात्रीने विशेष गाडय़ांच्या विलंबाचा अभ्यास केला असून विशेष गाडय़ांनी प्रवास करणाऱ्यांना योग्य नियोजन करण्याची सूचना केली आहे. दरवर्षी रेल्वेकडून गर्दीच्या मार्गावर विशेष गाडय़ा सोडल्या जातात, परंतु या गाडय़ांमुळे रेल्वे मार्ग अधिक व्यस्त होतात आणि नियमित गाडय़ांना प्राथमिकता देण्यात येऊन विशेष गाडय़ांना ठिकठिकाणी कित्येक तास थांबवून ठेवण्यात येत असल्याचे चित्र नेहमीचे झाले आहे. मात्र या प्रवाशांना कित्येक तास ताटकळत का राहावे लागते, याची कारणमीमांसा रेल्वे यात्रीने केली आहे. विशेष गाडय़ांना विलंब का होतो व या गाडय़ांबद्दल पुरेशी माहिती का उपलब्ध नाही, याची कारणे शोधण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कमी करण्यासाठी ऐनवेळी विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला जात असल्याने योग्य नियोजन होत नाही आणि दररोजच्या वेळापत्रकात या गाडय़ांना सामावून घेताना दमछाक होते. विशेष गाडय़ांना विशेष महत्त्व दिले जात नाही. रेल्वे मार्ग उपलब्ध करून देण्यास नियमित गाडय़ांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विशेष गाडय़ांना प्रतीक्षा करावी लागते. विशेष गाडी चालविण्यासाठी रेल्वेकडे वेगळे डबे नसतात. उपलब्ध डब्यातून विशेष गाडी चालवावी लागते. त्यामुळे डब्यांची देखभाल-दुरुस्ती आणि ते वेळेत उपलब्ध व्हावे, याचा प्रचंड ताण रेल्वे प्रशासनावर असतो. याशिवाय, दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. विशेष गाडी काही दिवसांआधी सोडण्याचे जाहीर केले जाते. नवीन गाडीसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध होऊ शकत नसल्यानेही विशेष गाडय़ांना विलंब होतो, असे यात्रीच्या अहवालातून दिसून आले.