शफी पठाण, लोकसत्ता

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : लोक विचार करू लागले म्हणजे आपण त्यांच्यावर करीत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव होईल आणि ते बंड करून उठतील, अशी भीती सर्वच हुकूमशहांना वाटत असते. म्हणून सर्वच फॅसिस्ट आणि कम्युनिस्ट राजवटी विचारांच्या प्रगटीकरणाला रोखण्यासाठी सर्व उपाय योजत असतात. विचारी लोक हीच हुकूमशहांची खरी चिंता असते, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी शुक्रवारी केले.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा : चालू घडामोडी सराव प्रश्न

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी वर्ध्यात झाले. यावेळी माजी न्या. चपळगावकर संमेलनाध्यक्ष पदावरून बोलत होते. मंचावर संमेलनाचे उद्घाटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मावळते संमेलनाध्याक्ष, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी आणि समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

संमेलनाध्यक्षांनी साहित्याबरोबरच वर्तमान राजकीय आणि सामाजिक स्थितीवरही प्रखर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘आम्हाला वाटतो तोच इतिहास असा आग्रह लेखकाच्या स्वातंत्र्याच्या मुळावर येऊ शकतो. नाटक, चित्रपट यांना प्रदर्शनाची परवानगी देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड नावाची कायद्याने स्थापलेली संस्था आहे. काय प्रदर्शित व्हावे, याबद्दल निर्णय घेण्याचा तिलाच अधिकार आहे. तो पटला नाही तर न्यायालयात दाद मागता येते, परंतु तसे न करता सेन्सॉर बोर्डाचा निर्णय नाकारून आपलाच विचार लादण्याचा प्रयत्न केला जातो. अशी दंडामुडपी सुरू झाली म्हणजे कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेचे काय होते? अशावेळी सेन्सॉर बोर्डाचेच नव्हे तर पोलीस आणि न्यायालयांचेही अधिकार अशा मंडळींनी स्वत:कडे घेतलेले असतात.’’

पुरस्कार परत घेण्याच्या निर्णयाचा निषेध

अलीकडेच जाहीर झालेला एक वाङ्मयीन पुरस्कार राज्य सरकारने एक हुकूम काढून रद्द केला. असे प्रकार पूर्वीही झाले होते. सरकारच्या या आडमुठय़ा निर्णयाचा निषेध आपण केलाच पाहिजे, असेही संमेलनाध्यक्ष म्हणाले.

सरकारी साहित्य संमेलनाचे प्रयोजन काय?

महाराष्ट्र सरकारने नुकतेच एक विश्व साहित्य संमेलन आयोजित केले होते. पण, ही कृती चुकीची आहे. सरकारने साहित्य संमेलन भरवणे ही कल्पना कोणत्याही स्वतंत्र देशाला आणि स्वतंत्र समाजाला मानवणारी नाही. साहित्यालासुद्धा सरकारच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न हुकूमशाही आणि साम्यवादी देशात झाले. अशी साहित्य संमेलने यथावकाश साहित्याचे सरकारीकरण करणारी ठरू शकतात. साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल, पण तो सरकारच्या नियंत्रणात जाऊ नये, अशी अपेक्षाही चपळगावकरांनी व्यक्त केली.

संमेलनाध्यक्षांना आता राज्य अतिथीचा दर्जा

संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा मिळाला पाहिजे, असा एक विचार पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मििलद जोशी यांनी मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रतिसाद देत संमेलनाध्यक्षांना आता राज्य अतिथीचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा संमेलनाच्या मंचावरून केली. तसेच साहित्य संमेलनाला दरवर्षी दोन कोटी रुपये आणि बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संस्थांना दरवर्षी २५ लाखांचे अनुदान देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

साहित्य भवन मुंबईतच : केसरकर

शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पुस्तकांचे आणि भाषांचे महत्त्व जपणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. साहित्यिक मंडळींना अधिक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून मुंबईत साहित्य भवन निर्माण होत आहे, ते कुठेही बाहेर जाणार नाही. साहित्यिक तेथे राहू शकतील. त्यात नाटय़गृह आणि इतर सोयी-सुविधा असतील. दोन वर्षांनी ते उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात कायम साहित्यिक आणि त्यांच्या विचारांचा, सूचनांचा आदर होईल. साहित्यिक आणि राजकारणी यात आणीबाणीची स्थिती कधीही येणार नाही अशी ग्वाहीही केसरकर यांनी दिली. पुढच्या मराठी भाषा विश्व संमेलनाला १५ कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. केसरकर यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ पुस्तकाला मिळालेला पुरस्कार परत घेण्याच्या निर्णयाचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले. पुस्तक हिंसाचारी विचारांना प्रोत्साहन देणारे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

विदर्भवाद्यांची घोषणाबाजी

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुमारे ५० कार्यकर्ते सर्वसाधारण श्रोते म्हणून संमेलनाच्या मंडपात पोहोचले. आधी सर्व भाषणे होऊ दिली आणि ऐन संमेलनाध्यक्षांच्या भाषणावेळी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री व्यसपीठावरच असताना त्यांच्यासमोरच घोषणाबाजीने संमेलनाचा नूर पालटला. विदर्भवाद्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी स्वतंत्र विदर्भ न देणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेधाचा ठराव, स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडण्याची मागणी करण्यात आली. या अनपेक्षित घोषणाबाजीने पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर सर्वाना ताब्यात घेण्यात आले.

साहित्यिकांनी ‘समृद्धी’ टिपावी : मुख्यमंत्री

आमच्या सरकारने समृद्धी महामार्ग बनवला. या महामार्गामुळे येणारी समृद्धी लेखकांनी टिपली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनात सरकारी हस्तक्षेपाचा आरोप नेहमी होत असतो, परंतु आमच्या काळात संमेलनात सरकारी हस्तक्षेप झालेला नाही, हे मी दाव्यानिशी सांगतो, असे शिंदे यावेळी म्हणाले. आम्हीही एक विश्व साहित्य संमेलन घेतले. त्याचे कौतुक मला दावोसमध्येही ऐकायला मिळाले. साहित्यिकांनी नेहमी सरकारच्या चांगल्या कामांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

प्रबोधनाच्या चळवळीचे मूळ महाराष्ट्रातच : डॉ. श्रीकांत तिडके

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : भारतात प्रबोधनाची चळवळ ही फ्रेंच क्रांतीतून उद्यास आली असे बोलले जाते. परंतु ते खरे नसून महाराष्ट्रातील संतांनी ही चळवळ सुरू केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ संत साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी केले.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर उद्घाटन सत्रानंतर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा विषयावर परिसंवाद पार पडला. डॉ. श्रीकांत तिडके अध्यक्षस्थानी होते तर रेखा नार्वेकर, वासुदेव वले, डॉ. हनुमंत भोपाळे व डॉ. रमेश जलतारे यांनी यात सहभाग नोंदवला.

लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यात संतांचे मोठे योगदान राहिले असून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केवळ महाराष्ट्राने स्वीकारला याचे पूर्ण श्रेय संत गाडगे महाराजांना जाते, असे तिडके म्हणाले.

संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या विचारांचा झेंडा तेजस्वीरीत्या फडकवत ठेवला आहे, असे मत रेखा नार्वेकर यांनी व्यक्त केले. इतर मान्यवरांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे  संचालन ज्योती भगत यांनी केले तर डॉ. शोभा बेलखोडे यांनी आभार मानले.

कथाकथनाने श्रोते मंत्रमुग्ध

सहकार महर्षी बापूरावजी देशमुख व्यासपीठात आयोजित कथाकथनाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनंदा गोरे होत्या तर एकनाथ आव्हाड, अर्जुन व्हटकर, विलास सिंदगीकर, अशोक मानकर, प्रिया जोशी, गजानन देसाई यांचा यात सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन जयश्री अंबासकर यांनी केले तर प्रा. प्रमोद नारायणे यांनी आभार मानले.

Story img Loader