वाशीम : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षांतर्गत जिल्ह्यात १ हजार ७४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी ९७८ अंगणवाड्यांना स्वंतत्र इमारती आहेत. तर ९६ अंगणवाड्यांना आजही हक्काची इमारत नसल्याने त्या इतरत्र भरतात. त्यापैकी काही अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेत, ग्रामपंचायतीत, समाज मंदिरात तर काही अंगणवाडी सेवीकांच्या घरी भरत असून अंगणवाड्यांना कधी हक्काची जागा मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासह माता बालकांचे आरोग्यविषयक कामे ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रातून होतात. सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना अद्यापही हक्काची जागा मिळू शकली नाही. तसेच बहुतांश अंगणवाड्यांना आवश्यक त्या दर्जेदार सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – उपराजधानीत चोवीस तासांत दोन हत्याकांडाने खळबळ
जिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना कक्षांतर्गत जिल्ह्यात १ हजार ७४ अंगणवाड्या कार्यरत असून यामधे ३० हजार बालके आहेत. त्यापैकी ९७८ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत आहे. परंतु, ९६ अंगणवाड्यांना अद्यापही हक्काची इमारत नसल्याने ४१ अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेत भरतात.
३ ग्राम पंचायतीत, १० समाज मंदिरात, २४ एकत्रित, ८ अंगणवाडी सेविकांच्या घरी तर काही अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत, वाचनालयात, व्यायाम शाळेत, आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीत, मंदिरात. त्यामुळे बालकांना ज्ञानार्जनाचे धडे गिरविणाऱ्या अंगणवाड्यांना हक्काची जागा कधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.