वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकार विजयराज बोधनकर यांची ९६ स्वभावचित्रे संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहे. मूळचे आर्वी तालुक्यातील धनोडी येथील असलेल्या बोधनकरांचे शिक्षण वर्धेत झाले. त्यांची चित्रकारिता मुंबईत बहरली. देशविदेशात त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी चर्चेत राहिली आहे. २००४ पर्यंत ‘लोकसत्ता’शी जुळून राहलेल्या बोधनकर यांनी विविध साहित्य संमेलनात साहित्यिकांची स्वभावचित्रे रेखाटली आहेत.
तब्बल दहा वर्षे संमेलनापासून दूर राहिलेल्या बोधनकर यांनी आपल्या जन्मभूमीशी नाते सांगत वर्धेतील संमेलनात हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. त्यांची ९० चित्रे तयार असून विदर्भात संमेलन असल्याने या भागातील महेश एलकुंचवार, वसंत डहाके, सुरेश भट व अन्य एकूण सहा चित्रे नव्याने तयार केली. काही तयार होत असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा >>> साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा स्वतंत्र मंडप
व्यक्तीच्या स्वभावातील गंमतीशी जुळणारे चित्र ते रेखाटतात. म्हणजे व्यंकटेश माडगुळकर यांना प्राण्यांची आवड होती. म्हणून चेहरा त्यांचा व शरीर हरणाचे असे चित्र तयार झाले. अठरा, एकोणवीसाव्या शतकात ज्यांनी समाजाला दिशा दिली अशा मान्यवरांचे ९० चित्रे तयार झालीत. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, यांचीही चित्रे रेखाटली आहे. चित्रांतूनही बरेच काही शिकायला मिळते. वाचनापासून दूर पळणाऱ्या नव्या पिढीला चित्राच्या माध्यमातून बोलके करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोधनकर म्हणाले.