96 students hospitalised after eating mid-day meal : चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन घेतल्याने ९६ विद्यार्थी आजारी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने अधिकार्यांकडून तपास केला जात आहे.
दरम्यान आजारी पडलेले हे विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गामधील आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पार्डी गावात शिक्षण घेत आहेत. आजारी पडल्यानंतर या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शाळेतील मध्यान्ह भोजन तयार करणारा स्वयंपाकी देखील आजारी पडला आहे.
शाळेत ९६ विद्यार्थ्यांनी शाळेत खिचडी खाल्ली आणि नंतर ते घरी गेले. त्यानंतर रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. आजारी पडणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना पाहून त्यांना ताबडतोब सावली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयाच्या मर्यादीत क्षमतेमुळे काही विद्यार्थ्यांना मुल येथील उप-जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालय आणि गडचिरोली येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सिव्हिल सर्जन डॉ. महादेव चिंचोले यांनी दिलेल्या माहितीनुसार बाधित विद्यार्थ्यांची संख्या ९६ पर्यंत पोहचली आहे. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. घटनेच्या प्राथमिक तपासात विद्यार्थ्यांना अन्नातून विष बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान राज्याच्या शालेय विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे क्षेत्र शिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे यांनी सांगितले.
हेही वाचा>> मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्रोलर्सचे मानले आभार; म्हणाले, “माशी जरी …
तेलंगणामध्येही असाच प्रकार..
तेलंगणातील गेल्या महिन्यात अशाच एका घटनेत, नारायणपेट जिल्ह्यातील मगनूर मंडल केंद्रातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास ५० विद्यार्थी मध्यान्ह भोजन खाल्ल्याने आजारी पडले होते. या घटनेत काही विद्यार्थींना डोके गरगरल्याचा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर ते चक्कर येऊन बाकड्यांवर कोसळले होते. यानंतर काही विद्यार्थ्यांनी शाळेत देण्यात आलेला भात अर्धवट शिजलेला होता असा आरोप केला होता. यानंतर शाळांमध्ये मुलांना दिले जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.