लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण झाले असून येथून आजपर्यंत १५ हजार जणांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. येथून ९७ वर्षीय डॉ. बाबुराव टी. सिद्धम यांच्यासह त्यांच्या पाच मुलांनीही वैद्यकीय शिक्षण घेतले असून हे कुटुंब मेडिकलच्या अमृत महोत्सवासाठी अमेरिकेतून नागपुरात दाखल झाले.

सध्या अमेरिकेत वास्तव्याला असलेले अनिवासी भारतीय डॉ. बाबाराव सिद्धम बुधवारी मेडिकलला पोहचले. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाडा दिला. लोकसत्ताशी बोलताना डॉ. सिद्धम म्हणाले, ते पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील तर सात वर्षांचे असताना आई दगावली. घरची स्थिती बेताची होती. मावशी व इतर नातेवाईकांच्या मदतीने १९४७ मध्ये दहावी व त्यानंतर बनारसमधून इंटरसायन्स अभ्यासक्रम केला.

आणखी वाचा-गृहमंत्र्यांच्या शहरात ऑटोरिक्षा चालकांमध्ये नियम मोडण्याची स्पर्धा

बनारसमधून शिक्षण घेण्यासाठी मावशीने शिवणकामातून जमावलेले २०० रुपये दिले होते. सोबत राज्यातील काही मित्रांनी मदत केल्याने हा अभ्यासक्रम होऊ शकला. त्यानंतर नागपुरातील मेयो रुग्णालयात वैद्यकीयशी संबंधित एलएमपी अभ्यासक्रम केला. त्यानंतर जिल्हा परिषदेत डॉक्टर म्हणून सेवा सुरू केली. दरम्यान नागपुरातील मेडिकलमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू झाला. परंतु जिल्हा परिषदेकडून अभ्यासक्रम करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे संचालकांसह इतर अनेक अधिकाऱ्यांकडे पायपीट केली. मला भारतीय संविधानानुसार शिक्षणापासून वंचित ठेवता येत नसल्याचे त्यांना कळवले. त्यामुळे विनापगारी शिक्षणाची परवानगी मिळाली.

१९६४ मध्ये मेडिकलला एमबीबीएस प्रवेश घेतला. यावेळी आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने व आता वेतनही मिळणार नसल्याने एकीकडे कामठीत खासगी रुग्णसेवा देत शिक्षण सुरू केले. १९६९ मध्ये एमबीबीएस पूर्ण झाले. यावेळी मी हे शिक्षण घेत असतानाच दुसरीकडे माझी पत्नी सुनंदा आर्ट्समध्ये तर डॉ. विनोद, डॉ. प्रमोद, डॉ. छाया, डॉ. माया, डॉ. गणेश सिद्धम ही मुले-मुलीही वेगवेगळ्या ठिकाणी शिकत होती. हळूहळू सगळ्यांनीच मेडिकलमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. आता त्यापैकी तिघे अमेरिकेत स्थायी झाले असून एक नागपूर व एक मुलगी सोलापूरला वास्तव्याला आहे. वैद्यकीय शिक्षण घेताना पैसे नसल्याने बर्डीतील जुन्या पुस्तक बाजारातून १० रुपयांमध्ये पुस्तकही त्यावेळी खरेदी करत तेच पुस्तक कालांतराने इतरही मुलांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान वापरल्याचेही डॉ. सिद्धम यांनी सांगितले. दरम्यान आमच्या कुटुंबात आता चार नातू आणि एक सूनही डॉक्टर असल्याचे अभिमानाने त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-धक्कादायक! करात वाढ केल्याने सरपंच, सचिवसह ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबले

पत्नीही होमिओपॅथी डॉक्टर

कुटुंबात माझ्यासह सगळ्याच मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. यावेळी पत्नीचे शिक्षण आधी आर्ट्समध्ये झाले होते. परंतु, सगळेच डॉक्टर असल्याने मीही कशाला मागे रहावी म्हणून तिनेही होमिओपॅथीचे शिक्षण घेतले. त्यामुळे तिच्यामुळे कुटुंबातील सगळेच डॉक्टर झाल्याचेही डॉ. बाबुराव सिद्धम यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 97 year old man and his five children studied in medical nagpur mnb 82 mrj
Show comments