महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात २०२१ ते मार्च २०२४ दरम्यान ९९ वेळा मनोरुग्णांमध्ये हाणामारी झाली. त्यात काही रुग्ण जखमीही झाले. हाणामारी करणाऱ्यांमध्ये पुरुष रुग्णांच्या तुलनेत महिला रुग्णांची संख्या अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून हा तपशील समोर आला आहे.
नागपुरात ९४० रुग्णशय्येचे प्रादेशिक मनोरुग्णालय आहे. या रुग्णालयात २०२०- २१ मध्ये एकूण १ हजार २०७ रुग्ण, २०२२- २३ मध्ये १ हजार ४७३ रुग्ण, २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये १ हजार ७८१ रुग्णांवर उपचार केले गेले. या रुग्णालयात २०२२- २३ मध्ये ३७ हजार १४१ रुग्ण, २०२३- फेब्रुवारी २०२४ मध्ये ४७ हजार ३०१ रुग्णांवर उपचार झाल्याचेही माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.
आणखी वाचा-विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
या रुग्णालयात २०२१ ते मार्च २०२४ दरम्यान रुग्णांमध्ये ९९ वेळा हाणामारी झाली. त्यात पुरुषांच्या हाणामारीच्या ४१ तर महिला रुग्णांमध्ये हाणामारीच्या ५८ घटनांचा समावेश आहे. येथे या काळात आकस्मिक घटनेमुळे २६ रुग्ण जखमी झाले. त्यात १० पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. हाणामारी व आकस्मिक घटनेमुळे जखमी रुग्णांची संख्या बघता रुग्णालय प्रशासनाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रुग्णांचे मृत्यूही वाढले
२०१९- २० मध्ये ८ पुरुष आणि ११ महिला अशा एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२०- २१ मध्ये ५ पुरुष आणि ७ महिला अशा एकूण १२ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. २०२१- २२ मध्ये ८ पुरुष आणि १० स्त्री अशा एकूण १८ रुग्णांचा, २०२२- २३ मध्ये १३ पुरुष आणि २२ महिला अशा एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान येथे १२ पुरुष आणि १२ महिला अशा एकूण २४ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांत येथे मनोरुग्णांचे मृत्यू वाढल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे.