मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीतील अनेक आघाडीचे कलावंत सहभागी

नागपूर : विदर्भाची लोककला आणि संस्कृतीची ओळख करून देत ढोल-ताशांचा निनादात निघालेल्या दिमाखदार नाटय़दिंडीने नाटय़ संमेलनाला सुरुवात झाली. नाटय़दिंडीमध्ये संमेलनाचे आजी माजी अध्यक्षासह मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीतील अनेक आघाडीचे कलावंत सहभागी झाले होते. नाटय़दिंडीने महाल परिसर गर्दीने फुलून गेला होता.

नाटय़ संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मावळत्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार, अध्यक्ष प्रसाद कांबळी, गिरीश गांधी आणि राजे मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते पालखीतील नटेश्वराची आणि साहित्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला.  एक एक करीत मराठी नाटय़ व चित्रपट सृष्टीतील कलावंत सहभागी झाले. टेकडी गणपती, झिरो माईल स्टोन नागपूरची ऐतिहासिक मारबत, बडग्या, तान्हा पोळा, दीक्षाभूमीच्या प्रतिकृतीसह  शिवकालीन दांडपट्टा, लोकनृत्य, लेझिम पथक, वारकरी भजन पथक, तंटय़ा, महिलांचे भजन मंडळ  दिंडीत सहभागी झाले होते. नाटय़दिंडी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी नाटय़दिंडीवर फुलांचा वर्षांव  करण्यात आला. अनेक नाटय़ कलावंतांनी ढोल-ताशांवर नृत्य केले. महाल भागात दिंडी येताच अभिनेते भरत जाधव आणि प्रसाद कांबळी यांनी गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हिंदू मुलींच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुलाब फुलांचा वर्षांव करीत नाटय़दिंडीचे स्वागत केले. नाटय़दिंडीच्या मार्गावर प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. चिटणीस पार्क, बडकस चौक, केळीबाग मार्ग, कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक, जुनी शुक्रवारी मार्गे नाटय़दिंडी संमेलन स्थळ पोहोचली.

कलावंतांची उपस्थिती

या नाटय़दिंडीत अभिनेते माजी संमेलनाध्यक्ष मोहन आगाशे, परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी,  विजय केंकरे, मंगेश कदम, अविनाश नारकर, एश्वर्या नारकर, राजन ताम्हणे, अल्का कुबल, फैय्याज, रेशम टिपणीस, तेजश्री प्रधान, राजन भिसे, अभिजित साटम, प्रदीप वेलणकर, राहुल रानडे, संदीप पाठक, संतोष जुवेकर, अद्वैत दादरकर, भरत जाधव, केदार शिंदे, नाना उजवणे इत्यादी मराठी चित्रपट सृष्टीतील  कलावंत सहभागी झाले होते.

कलावंतांसोबत सेल्फी

एरव्ही घरोघरी छोटय़ा पडद्यावर दिसणारे मराठी नाटय़सृष्टीतील आघाडीचे कलावंत नाटय़दिंडीत सहभागी होऊन लोकांसोबत चालत असताना अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे या सेल्फीच्या नादात दिंडीला अनेक ठिकाणी थांबावे लागत होते.  यात स्थानिक नाटय़ कलावंत मागे नव्हते.

महानगर शाखेचा निषेध

चिटणीस पार्क चौकात परिषदेच्या महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध केला. मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर महानगरचे सदस्य दिंडीमध्ये काळ्या फिती लावून सहभागी झाले.

Story img Loader