अकोला: संततधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात एक १० वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात घडली. जियान अहमद इक्बाल कुरेशी (१०,रा. खैर मोहम्मद प्लॉट) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.
अकोल्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील नाले भरभरून वाहत आहेत. दरम्यान, खैर मोहम्मद प्लॉट येथे पावसाच्या पाण्यात जियान आणि त्याचे मित्र घराबाहेर खेळत होते.
जियान याची चप्पल नाल्याच्या पाण्यात गेली. चप्पल वाहत असताना ती पकडण्यासाठी तो त्यामागे धावत गेला. पाण्याचा आणि नाल्याचा अंदाज न आल्याने जियान पाण्यात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि मनपा अग्निशमन विभागाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा… गडचिरोली : ८३ वर्षांच्या बापाला कोणी सोडून जातं का? अनिल देशमुखांची भावनिक साद
युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्रीचा अंधार आणि मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे आले. त्यामुळे रात्री उशीरा शोध मोहीम थांबविण्यात आली. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.