अकोला : किरकोळ कारणावरून लहान मुले एकदम टोकाचे पाऊल उचलत असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून समोर आले आहेत. अशीच एक घटना अकोला रेल्वेस्थानकावर घडली. एका १२ वर्षीय मुलाने रागाच्या भरात आपले घर सोडून अकोला रेल्वेस्थानक गाठले. तो रेल्वेस्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असल्याने ठाण्यात आणून रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी त्याची विचारपूस केली. पोलीस, बालकल्याण समिती व चाईल्ड हेल्पलाइनच्या मदतीने त्या मुलाचे समपुदेशन केले. त्यानंतर सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे  हरवलेला मुलगा परत मिळाल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवासासाठी रेल्वेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या गर्दीचा गैरफायदा घेतात. गुन्हेगारी कामासाठी लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, अकोला रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर मुलगा अस्वस्थ अवस्थेत बसला होता. कर्तव्यावर असलेले सहाय्यक सुरक्षा निरीक्षक मुकुंद जगताप, प्रवीण मालवीय आणि कर्मचारी विकास उमाले यांना तो दिसून आला. पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलाची विचारपूस केली. प्रश्न विचारल्यावर बालकाने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.  त्यामुळे त्याला आरपीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सहाय्यक सुरक्षा निरीक्षकांनी त्वरित रेल्वे चाईल्ड हेल्पलाईनला माहिती कळवली. चाईल्ड हेल्पलाईनचे राहुल चोरपगार हे त्वरित आरपीएफ ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी मुलाची सविस्तर चौकशी केली. बालकाने आपले नाव योगराज वडिलांचे नाव योगेश श्रीवास आणि वय १२ वर्षे असल्याचे सांगितले. त्याने घरच्यांवर नाराज होऊन घर सोडल्याचे उपस्थितांना सांगितले. रेल्वे चाईल्ड लाईनने त्याचे समुपदेशन करून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना अकोला येथे बोलावले.

बालकाची आवश्यक समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बालकल्याण समिती अकोला यांच्या माध्यमातून त्याला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन यांच्या तत्काळ व समर्पित प्रयत्नामुळे हरवलेला मुलगा कुटुंबाला परत मिळाला. रेल्वेस्थानक परिसरात कोणी संशयास्पद व्यक्ती अथवा आपत्कालीन स्थितीत असलेले बालक दिसल्यास त्वरित जवळच्या आरपीएफ ठाण्याला माहिती द्यावी, आपल्या सतर्कतेमुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो, असे रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने सांगण्यात आले आहे.