नागपूर: नाईक तलावातून रविवारी बाहेर काढण्यात आलेल्या तब्बल १२० किलोचा कासव आमच्या देवाचा आहे. तो दररोज मंदिरात दर्शनाला येतो. त्या कासवाला आमच्या तलावात परत सोडा, अशी मागणी तलाव परिसरातील काही नागरिकांनी केली आहे. या मागणीमुळे प्रशासनही पेचात पडले आहे. सध्या हे कासव वनखात्याच्या अखत्यारितील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात आहे.

शहरातील नाईक तलावात सुमारे वर्षभरापासून एक कासवाचे वास्तव्य होते. या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर त्याला तलावातून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण गाळात अडकल्यामुळे या प्रयत्नांना यश येत नव्हते. सुमारे महिनाभरापासून या कासवाने येथे काम करणाऱ्या कामगारांना दमवले. उन्हाळ्यात तलावातील पाणी आटल्यामुळे ते कासव स्पष्ट दिसून येत होते. मात्र, गाळात फसल्याने त्याला बाहेर काढण्यात अनेक अडचणी होत्या. अखेरीस त्या कासवाला तेथून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, गाळातून त्याला बाहेर काढण्यात जेवढा त्रास झाला, तेवढाच त्रास स्थानिकांनी त्या कासवाला बाहेर काढण्यास केलेल्या विरोधामुळे झाला. आमच्या तलावातला कासव आमच्या देवाचा आहे.

हेही वाचा >>>खेळाडूंसाठी आनंदवार्ता! महाराष्ट्रात पुन्हा रंगणार चेस लीग स्पर्धा; ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले, पाचवा ‘सिझन’…

तो दररोज मंदिरात दर्शनाला येतो, असे सांगून त्यांनी कासवाला गाळातून बाहेर काढण्यात आडकाठी आणली. येथे काम सुरू आहे आणि यंत्रात तो अडकला आणि मृत्युमुखी पडला तर काय करणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. पावसाळा आला की आम्ही त्या कासवाला परत याच तलावात आणून सोडू, असे आश्वासन दिल्यानंतर अखेर ते कासव बाहेर काढण्यात आले. ‘सॉफ्ट शेल्स’ या प्रजातीचे ते कासव असून वनखात्याच्या अखत्यारितील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात त्याला ठेवण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या आकाराचे कासव शहरात प्रथमच आढळले असून त्याचे आरोग्य उत्तम असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.

Story img Loader