नागपूर : एक लाखात तीन ते चार रुग्ण सेरेब्रल व्हिनस सायनस थ्रोम्बोसिस (सीव्हीएसटी) या दुर्मिळ आजाराचे असतात. हा आजार ३० ते ४० वयोगटात दिसतो. परंतु, मेडिकलमध्ये एका १३ वर्षांच्या मुलात हा आजार आढळला. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दीड महिने जीवनरक्षण प्रणालीवर राहिला. परंतु यशस्वी उपचाराने आता तो बरा झाला असून लवकरच त्याला रुग्णालयातून सुट्टी होईल.
तन्मय अरुण शेरकुरे (१३) रा. रामटेक, जि. नागपूर असे रुग्णाचे नाव आहे. त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. तन्मयच्या घरची स्थिती बेताची आहे. २७ जून २०२३ दरम्यान त्याला तीव्र डोकेदुखी, ओकारीसह विविध त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्यावर कुटुंबीयांनी त्याला नागपुरातील मेडिकलमध्ये २९ जूनला दाखल केले. विविध वैद्यकीय तपासणीत त्याला ‘सीव्हीएसटी’ असल्याचे निदान झाले.
हेही वाचा – नागपुरातील डॉक्टर, गर्भवती, बाळंत महिलाही डेंग्यूच्या विळख्यात
मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रुग्णाला हलवून त्याच्या मेंदूवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याला जीवनरक्षण प्रणालीवर टाकले गेले. तब्बल दीड महिने तो जीवनरक्षण प्रणालीवर होता. सकारात्मक बदलानंतर हळूहळू त्याला जीवनरक्षण प्रणालीवरून काढण्यात आले. आता तो सामान्य झाला असून मेडिकलच्या औषधशास्त्र विभागाच्या वार्डात सर्वांशी बोलतही आहे. या रुग्णाच्या यशस्वी उपचारात मेडिकलच्या औषधशास्त्र विभागातील डॉ. रश्मी नागदेवे, डॉ. प्रगती भोळे, डॉ. तेजस राठी, डॉ. आयुष ठाकूर, डॉ. ऋषीकेश हिरोडीकर, डॉ. शुब्रोदीप, डॉ. अलंकार, डॉ. श्रद्धेय, डॉ. अभय या सर्व डॉक्टरांसह परिचारिका व मदतनीसांचीही भूमिका महत्त्वाची आहे. उपचारादरम्यान आर्थिक स्थिती बरी नसल्याने रुग्णाची आई वार्डात राहत होती. वडील शेतीच्या कामाला रामटेकला जात होते. यावेळी रुग्णाच्या कुटुंबीयांची स्थिती बघत निवासी डॉक्टरांनी स्वत:च्या पैशाने एअर बेड खरेदी करून रुग्णाची सेवा केली. गुरुवारी रुग्णाच्या आईने डबडबलेल्या अश्रूंनी डॉक्टरांचे हात जोडून आभार मानले.
हेही वाचा – नागपूर : पुतण्याच्या प्रेयसीसोबत काकाने केले लग्न, अन पुतण्याने केले काकूसह पलायन!
सीव्हीएसटी म्हणजे काय?
सेरेब्रल व्हिनस सायनस थ्रोम्बोसिस (सीव्हीएसटी) आजारात रुग्णाच्या मेंदूच्या शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावते. साधारणपणे हा आजार एक लाखांमध्ये तीन ते चार रुग्णांत आढळतो. रुग्णाचे वयोगट साधारणपणे ३० ते ४० पुरुष संवर्गातील असते. परंतु, हा रुग्ण केवळ १३ वर्षांचा पुरुष संवर्गातील असल्याची दुर्मिळ स्थिती असल्याचे मेडिकलच्या डॉक्टरांनी सांगितले.