यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील सुकळी (न) येथे एका १४ वर्षांच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या एका घटनेत वणी येथे एका १४ महिन्यांच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी घडलेल्या या दोन्ही घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुकळी (न.) येथील वैभव विजय जाधव (१४) या मुलाने गावानजीक झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव यावर्षी आठव्या वर्गात गेला होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, लहान भाऊ, बहीण आहे. आईवडील मजुरी करतात. वैभव शुक्रवारी संध्याकाळी घराजवळ बांधलेली म्हैस आणण्यासाठी गेला. मात्र परत आलाच नाही. कुटुंबियांनी गावकऱ्यांच्या मदतीने रात्रभर शोध घेतला. शनिवारी गावाजवळील विद्युत सबस्टेशनजवळ नाल्यालगत निंबाच्या झाडाला वैभव दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे कारण कळले नाही.

हेही वाचा – गडचिरोली : हत्तीची छेड काढणे तरुणांच्या अंगलट, पाहा व्हिडीओ

खेळत असताना बालकाचा पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू झाला. वणी शहरातील प्रगतीनगर भागात ही घटना घडली. रियांश शंकर गिलबिले (१४ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. शनिवारी त्याचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी रियांश आणि त्याची आजी असे दोघेच घरी होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास आजीने रियांशला घरात सोडले व ती आंघोळीला निघून गेली. याचवेळी रियांश घराबाहेर आला. खेळत खेळत तो पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचला व पाण्याच्या टाक्यात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजी आंघोळ करून परत आल्यानंतर रियांश पाण्याच्या टाक्यात पडून असल्याचे आढळले. त्याला तत्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.