लोकसत्ता टीम
चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या ‘इन्स्पायर’ या खासगी ट्युशन क्लासमध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय प्राजंली हनुमंत राजुरकर या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.
‘आई, बाबा सॉरी. मला अभ्यासाचे टेन्शन आले आहे. त्यामुळे मी जगाचा निरोप घेत आहे,’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून तिने आज आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या भ्रमणध्वनीत आत्महत्येपूर्वीची एक चित्रफीतही आढळून आली आहे. प्रांजली मूळची यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील रहिवासी होती.
हेही वाचा >>>पुण्यासाठी ‘वंदे भारत’ नाही, पण ही विशेष गाडी धावणार
वसतिगृहात राहून शिक्षण
जिल्हा क्रीडा संकुलाजवळ प्रा. विजय बदखल यांचे ‘इन्स्पायर’ ट्युशन क्लासेस आहे. प्रा. बदखल यांच्या या क्लासेसमध्ये नीट आणि एमएच- सीईटी या एमबीबीएस आणि इंजिनिअरिंग शिक्षणासाठी आवश्यक एन्ट्रांस एक्झामच्या तयारीसाठी शेकडो विद्यार्थी धडे घेत आहेत. हे विद्यार्थी वसतिगृहात राहून इन्स्पायर ट्युशन क्लासेसमध्ये शिकतात. प्राजंली राजुरकर हीदेखील येथे शिकत होती. तिने आज वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा >>>गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
मंगळवारी काय घडले?
प्रांजली मंगळवारी मामाच्या घरी गेली होती. सायंकाळी वसतिगृहात परतली, तेव्हा तिने सोबतच्या विद्यार्थिनीला ‘मी थकली आहे. उद्या क्लासमध्ये येणार नाही,’ असे सांगितले होते. त्यानुसार ती आज क्लासमध्ये गेली नाही. दरम्यान, सायंकाळी ती वसतिगृहातील खोलीतून बाहेर आलीच नाही. त्यामुळे इतर विद्यार्थिनींना संशय आला. त्यांनी वसतिगृह प्रशासनाला माहिती दिली. वसतिगृह कर्मचाऱ्यांनी तातडीने तिची खोली गाठली. दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडला. यानंतर ही घटना समोर आली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.