बुलढाणा: बुलढाणा शहरातील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या ३२ वर्षीय परिचारिकेवर २३ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचा  संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्याने वेळोवेळी धमक्या देत तिच्या अब्रूचे लचके तोडले. याप्रकरणाची तक्रार पीडितेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी परिचारक असलेल्या २३ वर्षे तरुणावर अट्रोसिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. विशाल गजानन बोराडे ( रा.जुनागाव) असे या वासनांध तरुणाचे नाव असून तोदेखील एका खासगी रुग्णालयात परिचारक म्हणून नोकरी करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित नर्स बुलडाणा शहरातीलच राहणारी आहे. ती आणि आरोपी विशाल २०२१ मध्ये शहरातील जांभरुन मार्गावरील एका खासगी रुग्णालयात  नोकरीला होते. तिथेच दोघांची ओळख आणि त्यातून मैत्री  झाली. त्यानंतर दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे देखील सुरू झाले. पुढील काळात विशालने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वेगवेगळ्या खासगी रुग्णलयात काम करीत असलेल्या पीडितेचा त्याने पिच्छाच पुरविला.

हेही वाचा >>>धावत्या रेल्वेत पोलीस हवालदारांनी केला महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग

आरोपी विशाल तिला बदनामीची धमकी आणि तिच्या मुलांची हत्या करण्याची धमकी देऊ लागला. वारंवार विशालने त्याची शारीरिक भूक भागवली.  तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विशालविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमांसह भारतीय दंड विधानाच्या  कलम ३७६, ३७६(२)( एम), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस पोलीस  अधिकारी  सुधीर पाटील पुढील तपास करीत आहेत.

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाल्याचे दुर्देवी चित्र आहे. कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलांना भावनिक करून त्यांचे शारीरिक शोषण कसे करण्यात येते याचे ही घटना उदाहरण आहे. शारीरिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेला मागील संबंधावरून धमकावत आणि ‘ब्लॅकमेल’ करून नराधम कसा गैरफायदा घेतात हे या घटनेवरून दिसून येते. यामुळे कामावरील महिलांनी अशा नराधमांकडून सावध राहणे, दोन हात दूर राहणे काळाची गरज आहे. दुसरीकडे एका हतबल महिलेचे आयुष्य नासविणाऱ्या आरोपी विशाल बोराडे याच्या विरुद्धचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा. तसेच विशाल याला कठोर शिक्षा होईल यादृष्टीने तपास करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 32 year old nurse working in a private hospital in buldhana was assaulted by a 23 year old youth scm 61 amy