निसर्गाने आपल्या कल्पकतेने सुंदर सजीवसृष्टी निर्माण केली आहे. या सजीवसृष्टीचा घटक म्हणून मंदिर, मूर्ती, भक्ती आणि भक्तही आपणच आहोत. भक्तांच्या हृदयामध्ये परमेश्वराच्या अंतरंगाच्या रूपानेही आपणच आहोत, असा आत्मशोधाचा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रत्येक अभंग-कीर्तनातून मिळतो. त्यांचे हे विचार प्रेरणादायी ठरत असतात. हे विचार पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी मोझरी येथे एक आगळेवेगळे शिल्प साकारले जात आहे.
हेही वाचा- अचलपूरच्या बंद ‘फिनले मिल’साठी भारतीय मजदूर संघ सरसावला; शेकडो कामगारांची फरफट
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मरणार्थ त्यांच्या कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे त्यांचा महाकाय पुतळा उभारण्यात येत आहे. टाकाऊ पोलादी वस्तूंपासून हा पुतळा तयार करण्याचे सध्या काम सुरू आहे. २० फूट उंच आणि १५ फूट रुंद आणि ५ टनाचा हा भव्य पुतळा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच दास टेकडी जवळच्या तलावात पुतळा बसवण्यात येणार आहे. वाहनांच्या टाकाऊ साहित्याचा उपयोग करून हातात खंजिरी असलेली भावमुद्रा पुतळ्यात साकारण्यात येत आहे.
पुतळ्याच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. अंदाजे एकूण पाच टनापेक्षा अधिक वजनाचे दुचाकी, चारचाकी वाहनांचे निकामी झालेले टाकाऊ सुटे भाग यासाठी उपयोगात आणले जात आहेत. पाच कलाकारांची चमू अहोरात्र श्रम घेऊन राष्ट्रसंताच्या पुतळ्याला मूर्तरूप देत आहे. विदर्भात यापुर्वी वर्धा येथे महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. मास्टर ऑफ आर्ट प्रकाश गायकवाड (नागपूर), सुहास भिवनकर (यवतमाळ), युसूफ अन्सारी, शादाब अन्सारी, मुहम्मद तुफेल यांचा कलाकारांच्या चमूत समावेश आहे. शासकीय निधीतून पुतळ्याची निर्मिती होत आहे.
मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विजय सपकाळ, विजय बोंद्रे, विश्वनाथ साबळे, यांच्याकडे शासनाच्यावतीने ही जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणच्या कारागिरांच्या माध्यमातून मिळाली. या पुतळ्याला दासटेकडीजवळील राष्ट्रसंत सागर येथे ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीगुरुदेव सेवा मंडळचे अध्यात्म विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी दिली आहे.