नागपूर : झाडपत्तीचे औषध तयार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाने उपचार करण्याच्या नावावर १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती होऊन तिने मुलीला जन्म दिला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून वृद्धावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मनोहर सखाराम काठोके (ता. रामटेक) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित १६ वर्षीय मुलगी प्राजक्ता (काल्पनिक नाव) नववीत असताना घराच्या छतावर कपडे सुकवायला गेली होती. छतावरून पडल्यामुळे प्राजक्ताचे दोन्ही हात ‘फ्रक्चर’ झाले होते. मुलीवर रामटेक येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता.
हेही वाचा – चंद्रपूर : आदिम कोलाम समाजातील ७७ टक्के लोकांना त्यांचे लोकप्रतिनिधी माहिती नाही
मनोहर काठोके हा जंगलातील झाडपाला आणून त्याचा लेप तुटलेल्या हाडावर लावून पैसे कमावतो. १ जानेवारी २०२२ पासून मनोहर काठोके याने प्राजक्तावर उपचार सुरू केला. तिला काही दिवस झाडपत्तीचा लेप लावला. काही दिवसांतच त्याची वाईट नजर प्राजक्तावर गेली. जानेवारी २०२२ मध्ये मनोहर मुलीच्या घरी आला. त्यावेळी तिचे आईवडील शेतात गेले होते. मनोहरने तिच्या दोन्ही हाताला लेप लावला आणि खाटेला हात बांधले. त्यानंतर तिच्या तोंडात ओढनी कोंबली आणि मुलीवर बलात्कार केला. घडलेली घटना कुणालाही सांगितल्यास झाडपाल्याचे औषध पाजून ठार मारेल, अशी तिला धमकी दिली. गेल्या जानेवारीपासून तो नेहमी मुलीच्या घरी येऊन लेप लावण्याच्या बहाण्याने प्राजक्ताशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.
हेही वाचा – विदर्भातील दोन गिर्यारोहकांनी ‘माऊंट युनाम’ शिखरावर फडकवला तिरंगा
९ ऑगस्टला प्रजाक्ताच्या पोटात दुखायला लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी गर्भवती असल्याचे सांगितले. प्राजक्ताने वृद्ध मनोहर काठोके याने गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचे सांगितले. प्राजक्ताने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने रामटेक पोलीस ठाण्यात मनोहर विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनोहरला अटक केली. आरोपीने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली.