बुलढाणा: तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील ६५ वर्षीय महिलेने पंढरपूर वारी पूर्ण केली. याबद्धल त्यांचा गावातील मुस्लिम बांधवांनी सत्कार करून इतरांसमोर सर्वधर्मसमभावाचा एक आदर्श ठेवला आहे.
श्रद्धा, परिश्रम व निर्धार याची जोड लाभली तर काहीही अशक्य नाही हे गावातील सीता श्रीराम गवते या महिलेने सिद्ध केले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी पंढरपूरची आषाढी वारी यशस्वी केली. मंगरूळ ( ता. चिखली) येथील विठ्ठल रुख्मिणी संस्थानच्या पालखी सोबत तब्बल २४ दिवस प्रवास करून त्यांनी विठुमाऊलीचे दर्शन घेतले. यानंतर पिंपळगाव सराई येथे त्या परतल्या. त्यांच्या या भक्तीने प्रभावीत होऊन गावातील मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरी जाऊन साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार केला.
हेही वाचा… विवाहित महिलेसह दोन तरुणी बेपत्ता; गावात भीतीचे वातावरण, मुली विक्री रॅकेटचा ग्रामस्थांना संशय
पिंपळगांव ग्रामसेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष शेख फारुक शेख ममलू मुजावर यांनी सहकुटुंब या माऊलीचा सत्कार केला. यावेळी मन्नत फाऊंडेशनचे सचिव शेख जावेद शेख फारुक मुजावर, अध्यक्ष शेख साजेद शेख फारुक मुजावर, असलम पठाण, सखाराम आनंदा गवते, अवचितराव गवते, अशोक तरमले, राजेन्द्र देशमुख, सुदाम चंद्रे, शालिकराम गवते, संजय तरमले, सुनील खंडारे, संजय तायडे, विठ्ठल सोनुने, गजानन गवते, अशोक साखरे आदी उपस्थित होते.