अकोला: जिल्ह्यातील पिंजर येथील शेख अफ्फान शेख अय्युब बागवान (७) याची त्याच्या १७ वर्षीय चुलत भावानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सोळा दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हातातून कबुतर निसटल्याच्या कारणावरून रागाच्या भरात ही धक्कादायक घटना घडली.
पिंजर येथील शेख अफ्फान शेख अय्युब बागवान (७) या चिमुकल्या मुलाचे १९ डिसेंबर रोजी अपहरण झाल्याची तक्रार पिंजर पोलिसात दाखल झाली होती. अकरा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर ३० डिसेंबर रोजी शेख अफ्फानचा मृतदेह पिंजर बार्शीटाकळी रस्त्यावरील विहिरीत श्वानाच्या मदतीने आढळून आला होता.
दरम्यान, उत्तरीय तपासणीच्या अहवालानुसार ही हत्या असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला. चिमुकल्याचा गळा, तोंड दाबून हत्या केल्याचे अहवालातून समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची विचारपुस केली. एका शेतातील बंद असलेल्या खोलीत आम्ही दोघे कबुतर पकडण्यासाठी गेलो होतो. शेख अफ्फानच्या हातून कबुतर निसटल्यामुळे मी रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रकरणात घटनास्थळाची पाहणी करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिशानिर्देश दिले होते. त्यानंतर तपासाची सुत्रे वेगाने फिरली असता, चुलत भावानेच चिमुकल्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.