वर्धा : बुलढाणा अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते पूणे रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून केली आहे. दिल्ली येथे झालेल्या या भेटीत तडस यांनी बुलढाणा जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती रेल्वेमंत्र्यांना दिली. गाड्या कमी व प्रवासी भरपूर असे झाल्याने नागरिक वाहनाने पूणे गाठतात. ज्या गाड्या आहेत त्याचे आरक्षण मिळत नाही. म्हणून या मार्गावर गाड्यांची संख्या वाढवावी, सुपरफास्ट गाड्यांचा वर्धा व बडनेरा येथे थांबा द्यावा, असे तडस यांनी सुचविले.
वर्धा भुसावळ या पॅसेंजर या गाडीला एक्सप्रेस गाडीचा दर्जा देण्यात आल्याने ही गाडी आता कवठा, तळणी, दिपोरी, मालखेड, टिमटाला या स्थानकांवर थांबत नाही. त्यामुळे प्रवासांची गैरसोय होत आहे. तसेच नागपूर अमरावती, नागपूर काजीपेठ, बल्लारशाह भुसावळ या पॅसेंजर गाड्या सर्व थांब्यांसह पूर्ववत सुरू कराव्या. अश्याही मागण्या खा.तडस यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे तडस यांनी सांगितले.