चंद्रपूर : मुल तालुक्यातील चक दुगाळा गावालगतच्या शेतशिवारात वाघाने चक्क गाय व म्हशीच्या कळप रोखून धरला. बराच वेळ झालातरी वाघाने कोणतीही हालचाल केली नाही. त्यानंतर म्हशीच्या कळपाने चक्क वाघावर हल्ला चढवित वाघाला हुसकावून लावल्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, हा वाघ अशक्त असून कोणतीही शिकार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याचे चित्रफीतीतून स्पष्ट होत आहे.
गुरूवारी दुपारच्या सुमारास मुल तालुक्यातील चक दुगाळा व बेंबाळ येथील गुराखी गाय, बैल व म्हशी घेवून चारायला शेतशिवारात गेले होते. बेंबाळ शेतशिवार परिसरात असलेल्या पाळीवर चक्क वाघाने गाई व म्हशीच्या कळपाचा रस्ता रोखून धरला. बराच वेळ वाघाने रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर वाघ उठून उभा झाल्यानंतर चक्क म्हशीच्या कळपाने एकत्र वाघावर हल्लाबोल करीत हल्ला करून चक्क शिंगाने वाघाला उचलून आपटले. त्यानंतर कसाबसा म्हशीच्या तावडीतून सुटत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. म्हशीच्या कळपाने वाघाला हुसकावून लावले. यावेळी वाघाला पाहण्यासाठी परिसरात मोठा जमाव जमा झाला होता.
हेही वाचा >>>तुम्ही याला प्रतिष्ठेचा मुद्दा का बनवताय? चित्त्यांच्या मृत्यूबाबत केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले
घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली असून या चित्रफीतीमध्ये वाघ हा अशक्त असून शिकार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याचे दिसून येेते. वाघ हा बिमार असल्याचेही आता बोलले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.