अमरावती शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या गांधी चौक ते अंबादेवी मार्गावरील एक इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे, ही इमारत जीर्ण झालेली नव्हती किंवा तिचे बांधकामही फार जुने नव्हते.
कोसळलेल्या इमारतीत एक दूध डेअरी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री आणि रिपेरिंगचे दुकान होते, तसेच वरच्या माळ्यावर अन्य दोन दुकाने होते, असे एकूण चार दुकानांची ही इमारत गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कोसळली. इमारत कोसळल्यामुळे कोणतीही प्राणहानी झालेली नाही. मात्र, दूध डेअरीतील सर्व साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारतीला तडा गेल्याची माहिती मिळाल्याबरोबर महापालिकेचे पथक तसेच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली होती. ही इमारत मुख्य मार्गावर असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.
अचानक ही इमारत कशी कोसळली, असा प्रश्न मनपा प्रशासनासोबत स्थानिकांमध्ये चर्चिला जात आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. इमारतीतील रहिवाशांना सकाळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.