गोंदिया : जिल्हा अवैध मद्य तस्करीसाठी आता सुरक्षित झोन बनत असून, इथून अवैध दारू गोंदिया जिल्ह्याबाहेर छत्तीसगड राज्यामध्ये नेली जात आहे. दारू माफिया पोलीस विभागाशी साटेलोटे करून मोठ्या प्रमाणात इंग्रजी दारूची अवैध वाहतूक करत असल्याचे आमगाव-देवरी मार्गावरील अंजोरा गावशिवारात एका मद्य वाहतूक वाहनाचे अपघात झाले त्यातून हे उघड झाले आणि आमगाव पोलिसांचा निष्काळजीपणा उघड झाला. त्या अपघातग्रस्त वाहनात वाहन चालक अडकून आहे. अशी माहिती मिळताच आमगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान वाहनात अडकलेल्या जखमीला बाहेर काढण्यात आले. मात्र अपघातग्रस्त वाहन अवैधरित्या दारू वाहतूक करीत असल्याची बाब समोर आली. वाहनातून ४४२२० रुपये किंमतीची मद्यही जप्त करण्यात आली. ही कारवाई ४ ऑगस्टच्या रात्री ११.४५ वाजता सुमारासची आहे. आमगाव-देवरी या मार्गावरील अंजोरा गावशिवारातील शेतात एक अनियंत्रित वाहन अपघातग्रस्त झाले आहे. त्या वाहनात एक इसम जखमी असून तो अडकलेला आहे, अशी माहिती आमगावचे ठाणेदार युवराज हांडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर आमगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान वाहनात अडकलेल्या लिलेश्वर वर्मा याला बाहेर काढले. जखमी लिलेश्वरला क्र.१०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचाराकरीता आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता त्या वाहनामध्ये ४०२ दारूचे पव्वे किंमत ४४ हजार २२० रुपयांचा माल दिसून आला. सदर दारू अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची बाब समोर आली.
यावरून अपघातग्रस्त वाहन क्र. सीजी-०४ / झेडक्यु-८३०० सह एकूण ९४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी लिलेश्वर वर्मा (२४) रा. नवागाव ता. डोंगरगढ (छग) व इतर एक आरोपीविरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पो.नि युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप.पो.नि खेडकर, साबळे, शेंडे व रामटेके यांनी केली. मात्र या कारवाईवरुन सदर वाहतूक नित्यनेमाने नेहमी होत असल्याचा संशय बळावला आहे. रात्रीच्या सुमारास प्रत्येक वाहन तपासणी करूनच सोडण्यात येते, अशात सदर वाहनाची तपासणी करण्यात आली होती की नाही, असे प्रश्न उपस्थित होते. तसेच सदर कारचा अपघात झाला असल्यामुळे हे बिंग फुटले अन्यथा अशा प्रकारे राजरोसपणे ही अवैध मद्य वाहतूक होत असल्याचेही प्रमाण मिळतो. पण हे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही हे ही तितकेच खरे!