नागपूर : शहीद गोवारी उड्डानपुलावरून भरधाव जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नी उड्डानपुलावरून खाली कोसळले. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मेयोत उपचार सुरू आहेत. अनिता रुझवेल्ट दिलपे (३०, जयवंतनगर, मानेवाडा चौक) असे मृत महिलेचे तर रुझवेल्ट दिलपे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वीच सक्करदरा उड्डानपुलावरून कारने धडक दिल्याने खाली पडून चौघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच तशीच घटना पुन्हा घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुझवेल्ट दिलपे हे पत्नी अनितासह शनिवारी रात्री आठ वाजता दुचाकीने रहाटे कॉलनी चौकाकडून शहीद गोवारी उड्डानपुलावरून झिरो माईल चौकाकडे जात होते. पुलावरून कार क्र. (एमएच ३०-एटी १६७८) चा चालक अभिलाष अविनाश मनतकार (वय २९, अकोला) हा आपली होणारी पत्नी वैष्णवी लांडे हिच्यासह जात होता. बीग बाजारसमोर कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत रुझवेल्ट आणि अनिता हे दोघेही पती-पत्नी पुलावरून थेट खाली कोसळले. या अपघातात अनिताचा जागीच मृत्यू झाला तर रुझवेल्ट गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अभिलाष मानवतकार याला ताब्यात घेतले आहे.