वर्धा : १ जुलैला बुलढाणा येथे झालेल्या अपघातात २५ व्यक्तींचा बळी गेला. मात्र दीड महिना लोटूनही कोणावरही कारवाई झाली नसल्याने सर्वांचे कुटुंब आता संतप्त झाले आहे. इथे मृतकांचे आप्त एकत्र आले. त्यांनी श्रद्धांजली देताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या. अद्याप ट्रॅव्हल्स मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही.
या प्रकरणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत तर आमदार डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याची पण दखल प्रशासन का घेत नाही, असा सवाल करीत ट्रॅव्हल्स मालक पोलीस खात्यातील असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्या जातो का, असा आरोप कुटुंबीय करत आहेत. दरम्यान, मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रशासनाने काही बोध घेवून त्वरित उच्चस्तरीय चौकशी पूर्ण करावी व दोषींना शासन करावे, अशी मागणी करण्यात आली.