चंद्रपूर: बाल कामगारांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने जागतिक बाल कामगार विरोधी दिनी चंद्रपुरातील पडोली येथील बिट्टू नागी बॉडी बिल्डर वर्क्स व कश्मीरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप, लखमापूर या धोकादायक उद्योगामध्ये काम करणाऱ्या तीन बालकामगारांची सुटका करून व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला.
मुले स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करून पैसे कमावतात, त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफसफाई करायची, भांडी कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे, अशी अनेक कामे करावी लागतात. जागतिक बाल कामगारविरोधी दिनी जिल्हाधिकारी कार्यालय व सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून धाडसत्र राबवण्यात आले. यामध्ये चंद्रपुरातील पडोली येथील बिट्टू नागी बॉडी बिल्डर वर्क्स व कश्मीरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप लखमापूर या धोकादायक उद्योगामध्ये हे तीन बालकामगार आढळून आले.या तिघांना ताब्यात घेऊन सुटका केल्यानंतर व्यवसाय मालकाविरुद्ध पडोली व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.