भंडारा : खातखेडा येथे एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून कर्तव्य बजावत असलेल्या वनाधिकाऱ्यांवर संतप्त जमावाने हल्ला चढवला. यात सहाय्यक वनरक्षक नागुलवार हे गंभीररित्या तर वनपाल वावरे आणि गुप्ता हेसुद्धा जखमी झाले. वनाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी जमावाला चिथावणाऱ्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या ५ जणांवर पवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुन्ना तिघरे, रा. रेवनी, शितपुरा काटेखाये, रवि खातकर, राजकुमार काटेखाये, हिवराज मोटघरे सर्व रा. खातखेडा अशी आरोपींची नावे आहेत. पवनी तालुक्यातील गुडेगाव आणि खातखेडा परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाची दहशत पसरली होती. एक जखमी वाघ माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत होता. तो जखमी असल्यामुळे सहज उपलब्ध होईल अशा शिकारीच्या शोधत होता. त्यातच शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या ईश्वर मोटघरे यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल दि. २८ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. काही दिवसांपूर्वी याच वाघाने गुडेगाव येथील एका गुराख्याचाही बळी घेतला होता. तसेच दोन पाळीव जनावरेही फस्त केली होती. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याची माहिती कळताच गावातील आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनरक्षक नागुलवार यांच्यासह वनपाल गुप्ता, वावरे आणि बीट रक्षक संगीता घुगे हे घटनास्थळी पोहचले. त्यावेळी खातखेडा गावातील १० ते १५ नागरिक उपस्थित होते. ज्या इसमावर वाघाने हल्ला केला त्या ठिकाणाची पाहणी करीत असताना खातखेडा गावातून साधारण १०० ते १५० नागरिक घटनास्थळी आले. ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास अडवणूक करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – परदेशात शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेला ५ जुलैपर्यंत मुदतवाढ; सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…

सहायक वनसंरक्षक नागुलवार जमावाची समजूत घालत असताना जमावामध्ये असलेल्या मुन्ना तिघरे याने जमावातील लोकाना भडकावून फोरेस्टवाल्यांना मारा असे म्हणत वनपाल गुप्ता यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी जमावातील शितपुरा काटेखाये, रवि खातकर, राजकुमार काटेखाये, हिवराज मोटघरे यांनी नागुलवार व वनपाल वावरे यांना लाथबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गंभीररित्या जखमी झालेल्या नागुलवार यांना उपचाराकरिता हलविण्यात आले. बीट रक्षक संगीता घुगे यांच्या तक्रारीवरून वनाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against five persons who attack on forest officials on duty in bhandara district ksn 82 ssb
Show comments