अकोला : रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवायला जाणे चार ग्राहकांना चांगलेच भोवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत हॉटेल रेस्टॉरंट सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक व चार ग्राहकांवर विविध कलमान्वये शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहर कोतवाली पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना ताजनापेठ पोलीस चौकीजवळ एक रेस्टॉरंट बाहेरून बंद, परंतु आतून आवाज येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता, हॉटेलमालक अब्बास खान अहमद (७५), व्यवस्थापक फिदा हुसेन (२४) हे दोघे रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट चालवित असल्याचे दिसले. यावेळी रेस्टॉरंटमध्ये चार युवक जेवण करीत असल्याचे आढळले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतरही हॉटेलमालक व व्यवस्थापक हे रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यासह चार ग्राहकांविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कोणताही हॉटेल, रेस्टॉरंटचालक रात्री ११ नंतर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कोणतेही दुकान सुरू ठेवत असेल तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.