नागपूर  : भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नेते मुन्ना यादव याने धंतोली पोलीस ठाण्यात एका पोलीस हवालदाराला अश्लिल शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या प्रकरणात मुन्ना यादव याला शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, राजकीय दबाव आल्यामुळे त्याला मुक्त करण्यात आले होते. या प्रकारामुळे पोलीस दलात मोठी नाराजी होती.  रविवारी अखेर पोलिसांनी मुन्ना यादव व त्यांचे दोन मुले करण व अर्जुन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य बांधकाम कामगार मंडळाचा माजी अध्यक्ष व भाजपचा नेता मुन्ना यादव आणि त्याचा भाऊ बाला यादव यांच्यात शनिवारी  वाद झाला होता . मुन्ना यादवला राजकीय पाठबळ असल्यामुळे त्याचे दोन्ही मुले करण आणि अर्जून हे दोघेही वस्तीत दहशत निर्माण  करण्याचा प्रयत्न करतात. शनिवारी रात्री दहा वाजता करण आणि अर्जून हे दोघेही गरबा खेळायला बाहेर पडले होते. त्यावेळी बाला यादवची दोन्ही मुले देवी दर्शनासाठी आली. त्यावएळी करण आणि अर्जून या दोघांनी काही मित्रांसोबत मिळून बाला यादवच्या मुलांवर शेरेबाजी केली. त्यामुळे चिडलेल्या त्या दोघांनी शिवीगाळ केली. त्यामुळे करण-अर्जून आणि चुलत भावंडांमध्ये वाद झाला. करणने आपल्या काही मित्रांना लगेच गोळा केले. त्यामुळे बाला यादवच्या मुलांनीही आपल्या काही साथिदारांंना घटनास्थळावर बोलावले. दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थक आमने-सामने आले होते . दोन्ही गटातील तरुणांनी तलवारी काढल्या. एकमेकांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कुटुंबीयांतील करणसह चौघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर न्यूरॉन रुग्णालयात उपचार सुरु आहे तर अन्य तीन जखमींवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादव कुटुंबीय समोरासमोर आल्यानंतर दोन्ही गटातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जवळपास आठ ते दहा वाहनांचे नुकसान  झाले. पोलिसांना माहिती मिळताच  काही युवकांना ताब्यात घेऊन धंतोली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यापाठोपाठ दोन्ही गटातील नातेवाईकही पोहचले. मुन्ना यादवही पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने पोलिसांना शिवीगाळ करीत गोंधळ घातला .  पोलिसांना शिवीगाळ होत असल्यामुळे ठाणेदार अनामिका मिर्झापूरे यांनी लगेच अतिरिक्त कर्मचारी बोलावून घेतले. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा >>>यवतमाळ: पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बंजारा समाजाचा अपमान; माणिकराव ठाकरे यांची टीका

हवालदाराला केली मारहाण

मुन्ना यादव हा रागातच पोलीस ठाण्यात शिरला. त्याने पोलीस हवालदार सुभाष वासाडे यांची कॉलर पकडली. त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाणही केली.  त्यामुळे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता मुन्ना यादव हा उपायुक्तांवरही धावून गेला. त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण तापले होते.

हेही वाचा >>>अमरावती : आ. बच्‍चू कडू यांना धक्‍का; आ. राजकुमार पटेल शिवसेना शिंदे गटात…

अखेर गुन्हा दाखल या प्रकरणात शनिवारी

मुन्ना यादव आणि त्याचे मुले करण आणि अर्जून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र पोलिसांनी वरील तिघांवर  शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. पण याची चाहूल लागताच  एक आमदार धंतोली पोलीस ठाण्यात पोहचला. आमदाराने पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. मात्र, आमदाराला पोलिसांनी परत पाठवले. त्यानंतर अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी मुन्ना यादव याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, धंतोली पोलिसांनी अखेर रविवारी मुन्ना यादव आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर  गुन्हा दाखल केला. ठाणेदार अनामिका मिर्झापुरे यांनी याला दुजोरा दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against munna yadav and his two sons for assaulting the police in the police station adk 83 amy