नागपूर : वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांनीच सहकारी संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडली. तर संकेत यांनी पुरावा नष्ट करून गुन्हा दडवला. या प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला.
बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ५ मे २०२२ ला मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. संकेत घरून कर्तव्यावर जाण्यासाठी गणवेश परिधान करताना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. त्यामुळे त्या गडबडीत रिव्हॉल्वर डाव्या बाजूला खाली पडून त्यातील गोळी झाडल्या गेली. ती गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जाऊन फसल्याचा संकेतचा दावा होता. मात्र, ती गोळी लागली नव्हती तर गीता शेजवळ यांनी संकेतवर गोळी झाडल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी गीता शेजवळवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तर संकेत गायकवाड यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, शासनाची २० लाखांनी फसवणूक
गीता यांच्यावर आणखी एक गुन्हा
वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांनी एका यश नावाच्या युवकाला धमकी दिली. त्या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे गीता यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. संकेत आणि गीता यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी निर्णय होणार आहे.