यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची बदनामी होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप करत भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध उमरखेड पोलिसांनी सोमवारी उशिरा गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपादक संजय राऊत हे नेहमीच जाणीवपूर्वक वृत्तपत्रातून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल व देशात अशांततेचे वातावरण निर्माण होईल, असे लिखाण करत असल्याचा आरोप भुतडा यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘आता टेन्शन द्या’, जुनी पेन्शन योजनेसाठी उद्धव ठाकरेंचे आवाहन; म्हणाले, “मी मुख्यमंत्री असतो तर..”

संजय राऊत यांनी आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व प्रक्षोभक असे विधान केल्यामुळे देशाची जागतिक पातळीवर बदनामी झाली. भारत हा धर्मविरोधी देश आहे, असे या लेखातून राऊत यांनी भासविले. राऊत यांचे लिखाण गंभीर स्वरुपाचे असून त्यांनी देशात दोन धर्मांत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना अटक करून देशद्रोही प्रक्षोभक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलिसांत दिली.

हेही वाचा – स्वच्छ वायू सर्वेक्षण : शहरांची क्रमवारी जाहीर, चंद्रपूर १५ व्या स्थानी; जाणून घ्या आपल्या शहराचा क्रमांक

त्या आधारे उमरखेड पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी भाजपा जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर, अतुल खंदारे, पवन मेंढे, प्रतिक रुडे, प्रदीप शेरे, विक्की जोशी आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against sanjay raut in umarkhed police station nrp 78 ssb