संघर्ष यात्रेसाठी विनापरवानगी गर्दी जमवल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आमदार नितीन देशमुख यांनी श्री राजराजेश्वर मंदिरासमोरून जिल्ह्यातील ६९ गावे पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खारपाणपट्ट्यातील पाणी पाजण्यासाठी व अंघोळ घालण्यासाठी टँकरद्वारे संघर्ष यात्रेत पाणी नेण्यात आले.पोलीस हजर असतांना आमदार नितीन देशमुख व त्यांचे १०० ते १२५ कार्यकर्ते परवानगी न घेता खारे पाणी संघर्ष यात्रेसाठी सहभागी झाले होते.
हेही वाचा >>>नागपूर: भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी
जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून संघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवल्या प्रकरणी आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, दिलीप बोचे, योगेश गीते यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.