बुलढाणा: शिक्षकांची रिक्त पदे भरावी या मुख्य मागणीसाठी विध्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेत माटरगाव वासीयांनी केलेले आंदोलन गाजले. त्यांच्या मागण्या मंजूर करण्याची कार्यवाही करण्याऐवजी जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा समिती अध्यक्षासह माटरगाव ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम केला! दस्तुरखुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनी ही तक्रार दिली असून पोलिसांनीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे.
शिक्षणाधिकारी( माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी मागण्यांची पूर्तता करण्याची तत्परता दाखविण्याऐवजी थेट बुलढाणा पोलीस ठाणे गाठले! त्यांनी रीतसर तक्रार नोंदविली. बुलढाणा पोलिसांनीही सक्रियता दाखवून ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये शाळा समिती अध्यक्ष गणेश सपकाळ यांच्यासह राजू देवचे, हरीश घोंगडे, एकनाथ मिरगे, निलेश खंडारे, प्रकाश हिरळकर ,गजानन राऊत, कैलास फाटे, एकनाथ शेगोकर ( रा. माटरगाव) या ग्रामस्थाचा समावेश आहे. त्यांच्या विरुद्ध भादवीच्या कलम ३५३, १४३, १४९ तसेच बाल न्याय मुलांचे काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे सहकलम ७५, मोटार वाहन कायदा चे सहकलम ६६/१९२ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले. या तत्पर कारवाईचा तपास पोलीस उप निरीक्षक रमेश कानडजे हे तत्परतेने करीत आहे. या आरोपीनी पाचवी ते दहावीच्या २५० ते ३०० विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करून जिल्हापरिषदेत आणले. तसेच उप मुकाअ आशिष पवार यांच्या समक्ष अधिकाऱ्यांना लोटपोट करीत शासकीय कामात अडथळा आणला असे तक्रारीत नमूद आहे.
हेही वाचा >>>आर्णी येथील सराफा व्यवसायिकाला लुटणाऱ्या आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
हेही वाचा >>>नागपूर: धर्मेश धवनकरांना बडतर्फ करणार? – चौकशी समितीचा तपास पूर्ण
काय आहे पार्श्वभूमी?
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हापरिषद माध्यमिक शाळेच्या तीनएकशे विद्यार्थ्यांनी काल बुधवारी बुलढाणा गाठून जिल्हा परिषदेत ‘शाळा’ भरविली. शाळा समिती अध्यक्षासह पालकही आंदोलनात सहभागी झाले. कार्यालयाच्या मुख्यद्वारा समोर ठिय्या धरत राष्ट्रगीत गायन करून मध्यान्ह भोजनही केले. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी खाली येऊन चर्चा करण्याची मागणी केली. मात्र त्यांना ताटकळत ठेवल्यावर व काही जण कक्षात आल्यावर कुठे’ ‘सीईओ’नी खाली येत चर्चा केली. ‘आंदोलक’ परतत नाही तोच पोलीस कार्यवाही करण्यात आली.