गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आरेवाडा ग्रामपंचायतीत पाच कोटींच्या विकासकामावरून माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या मुलाने आदिवासी महिला सरपंचासह सदस्यांना शिवीगाळ करुन धमकावल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणात ‘लोकसत्ता’ने बातमी प्रकाशित करताच दुसऱ्या दिवशी गुरुवारला अखेर माजी जि.प.अध्यक्षाच्या पुत्रावर अट्रॉसिटीनुसार भामरागड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरपंच सरिता वाचामी व इतर सदस्यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार, अहेरी येथील जि.प.चे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांचा मुलगा शुभम कुत्तरमारे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.

हेही वाचा – नागपूर : ‘एम्स’मध्ये पेटस्कॅनसाठी रुग्णांची फरफट ! औषध नसल्याचे सांगत परत पाठवणी

आरेवाडा ग्रामपंचायतीत आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रम अंतर्गत आलेल्या पाच कोटींची विकास कामे मंजूर आहेत. अहेरी येथील एका हॉटेलात २१ डिसेंबरला शुभम कुत्तरमारे याने कामे करण्यावरुन सरपंच सरिता राजू वाचामी व इतर सर्व सदस्यांना जातिवाचक शिवीगाळ करित जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २२ डिसेंबरला आरेवाडा ग्रामपंचायतीत मासिक सभा सुरु होती. यावेळी तेथे येऊन शुभम कुत्तरमारे याने पुन्हा जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. अखेर २८ डिसेंबरला सरिता वाचामी यांच्या फिर्यादीवरुन शुभम कुत्तरमारेविरोधात अट्रॉसिटी व धमकावल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा – नागपूर : काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर मंथन, राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेबाबतही चर्चा

सरपंचांविरोधातच केली तक्रार

शुभम कुत्तरमारे याने महिला सरपंच व सदस्यांना दोनवेळा जातिवाचक शिवीगाळ करुन उलट सरपंच सरिता वाचामी व सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दिला. यात माझ्याविरुद्ध हे सर्व जण अट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करु शकतात, असा दावा करुन स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याचा बनाव ओळखला व त्याच्याविरोधातच गुन्हा नोंदवून दणका दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case of atrocity registered against son of former zp president man said bad words to woman sarpanch incidents in gadchiroli district ssp 89 ssb