चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय पावडे यांच्यावर त्याच्या कार्यालयात रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिलेसोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची तक्रार रामनगर पोलिसात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पावडे यांनी रोजंदारीचे काम संपल्यावर महिलेला काढून टाकल्याने महिलेने खोटे आरोप केल्याचा दावा केला आहे.
दाताळा एमआयडीसी मार्गावर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय आहे. या कार्यालयात संजय पावडे हे मागील अनेक वर्षांपासून सचिव पदावर कार्यरत आहे. त्यांच्याच कार्यालयात रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिलेने पावडे यांच्यावर गंभीर आराेप केले आहे. नोव्हेंबरमध्ये पावडे यांनी अश्लिल वर्तन केले होते. त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती. परत, ५ जानेवारीला अश्लिल वर्तन केल्याने महिलेने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पावडे यांनी स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले आहे. सदर महिला रोजंदारी तत्त्वावर काम करीत होती. काम संपल्यानंतर काढून टाकल्यानंतर महिलेने चार ते पाच लोकांना सोबत घेवून कार्यालयात धिंगाणा घातला. कामावर न घेतल्यास खोटी तक्रार व चारित्र्यावर लांच्छन लावण्याची धमकी सुध्दा दिली होती. याबाबत महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रामनगर पोलिसांनी दोन्ही तक्रार दाखल करून चौकशीला सुरूवात केली आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाने चौकशी सुरू केली आहे.