नागपूर : राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील प्रत्येक वाघाची एक वेगळी कथा आहे. वाघांची संख्या कशी वाढली, त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रयत्न यशस्वी कसे ठरले, वाघांची जीवनशैली कशी आहे, अशा विविध कथांचा वेध घेणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’चे बुधवार, १३ सप्टेंबर रोजी प्रकाशन होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात ४४४ वाघ असल्याचे ताज्या व्याघ्रगणनेत स्पष्ट झाले. या वाघांनी देशातीलच नव्हे, तर परदेशातील पर्यटकांनाही आकर्षित केले आहे.  ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण असल्याचे मानले जाते. तिथे गाभा क्षेत्रातच नव्हे, तर बफर क्षेत्रात आणि आजूबाजूच्या वनक्षेत्रातही वाघांची संख्या मोठी आहे. पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर व्याघ्रप्रकल्पांमध्येही वाघांची संख्या वाढत आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सद्य:स्थितीत वाघ नसला तरी, वाघ तिथे अधिवास करून गेला आहे. एकीकडे राज्यातील वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे संवर्धन आणि संरक्षणाचा मुद्दाही महत्वाचा आहे. स्थलांतर करताना वाघांना सुरक्षित कॉरिडॉर गरजेचा असतो. जखमी झाल्यानंतर त्याच्यावरील उपचारही आवश्यक ठरतात. त्याच्या संरक्षणासाठीचे कायदे आणि संवर्धनाच्या प्रक्रियेत ग्रामस्थांना सहभागी करून घेण्यासाठीच्या योजनाही महत्त्वाच्या आहेत. ‘कॉफी टेबल बुक’मध्ये या सर्व बाबींचा उहापोह करण्यात आला आहे.

महाराष्ट्र वनविभागाच्या वतीने आणि ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने तयार झालेल्या या ‘कॉफी टेबल बुक’ मध्ये व्याघ्रसंवर्धनाशी निगडीत कॉरिडॉर, व्याघ्रक्षेत्रातील गावांचे पुनर्वसन, योजना, कायदे, व्याघ्रगणना, वाघ आणि आदिवासींचा संबंध, स्थलांतरण अशा अनेक विषयांचा वेध घेण्यात आला आहे. व्याघ्रसंवर्धनावर आधारित या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये वनखात्यातील आजी आणि माजी वनाधिकाऱ्यांनीही विविध विषयांवर भाष्य केले आहे. यात प्रामुख्याने ‘महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्याच्या वनखात्याचे माजी प्रधान सचिव प्रवीण परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (सेवानिवृत्त) वन्यजीव विभाग सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (सेवानिवृत्त) वन्यजीव विभाग नितीन काकोडकर यांच्यासह विभागीय वनाधिकारी विशाल माळी, विभागीय वनाधिकारी अतुल देवकर, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी किशोर मिश्रीकोटकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, ‘ट्रँक्विलायिझग’ या विषयातील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, महाराजबाग प्राणीसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर, गोरेवाडय़ातील बचाव केंद्राचे डॉ. विनोद धूत, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, यादव तरटे पाटील, मिलिंद परिवक्कम, सुनील करकरे, दीप काठीकर यांचा समावेश आहे. या ‘कॉफी टेबल बुक’चे वैशिष्टय़ म्हणजे, यात राज्यातील सहाही व्याघ्रप्रकल्पांतील वाघांची मुशाफिरी, त्यांची वेगवेगळी भावमुद्रा टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. ही सर्व छायाचित्रे महाराष्ट्रातील वन्यजीव छायाचित्रकार गजेंद्र गावणे, युवराज पाटील, मकरंद परदेशी, इंद्रजित मडावी, दीप काठीकर, अरविंद बंडा यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपली आहेत.

‘वाघ : अधिवासाचं आव्हान’वर चर्चासत्र

‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशनानिमित्त ‘वाघ : अधिवासाचं आव्हान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या चर्चासत्रात ‘महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वनखात्याचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्याचे वनबलप्रमुख शैलेश टेंभूर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सेवानिवृत्त) वन्यजीव विभाग सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सेवानिवृत्त) वन्यजीव विभाग नितीन काकोडकर सहभागी होणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A chance to unravel the tiger story release of coffee table book tomorrow in mumbai ysh