नागपूर : महाराष्ट्रातील सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळा आता पाच किंवा दहा वर्षांसाठी दत्तक घेता येणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ही ‘दत्तक योजना’ राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे देणगीदाराने सुचवलेले नाव संबंधित सरकारी शाळेस देता येणार आहे. देणगीदाराने शाळेस नवीन नाव दिल्यास सध्याचे नाव सदर नावाच्या पूर्वी किंवा नंतर लावता येईल असंही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. सरकारच्या या योजनेवर विविध स्तरांतून तीव्र टीका होत आहे. याचा एका गंभीर प्रकार समोर आला आहे.
मद्याचे विविध ब्रॅण्ड तयार करणाऱ्या कंपनीने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एक शाळा दत्तक घेतली. या शाळेत दिवसा विद्यार्थ्यांची शाळा भरली तर रात्री गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर स्टेज तयार करण्यात आले होते. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणी ही तयारी करण्यात आली होती.
हेही वाचा – प्रसूतीनंतर अत्यवस्थ तिसऱ्या महिलेचाही मृत्यू; गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेची स्थिती गंभीर
दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजेचे मोठमोठे स्पीकर्स लावून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने तिच्या डान्सने परिसरातील तरुणांना वेड लावले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रॅण्डसाठी प्रसिद्ध असलेली कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. गौतमीचा महाराष्ट्रातील प्रत्येक नाच-गाण्याचा कार्यक्रम हा नेहमीच वादग्रस्त ठरतो. त्यानंतर शाळेत झालेला कार्यक्रम पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे.